देवनार कचराभूमीला खेटून उभ्या असलेल्या अनधिकृत झोपडय़ा हटवून तेथे मनोरंज मैदान उभारण्याचे पालिकेचे स्वप्न झोपडपट्टीवासियांच्या प्रखर आंदोलनामुळे भंग पावण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. तोडलेल्या जागी भरणी करण्यास आणि उर्वरित झोपडय़ा तोडण्यास प्रखर विरोध होऊ लागला असून कायदा आणि सुव्यवस्था चिघळू नये म्हणून पोलिसांकडूनही संयमाची भूमिका घेतली आहे. देवनार कचराभूमीत लागलेल्या आगीचा धूर केवळ मानखुर्द, देवनार, चेंबूर परिसरातच नव्हे तर थेट दक्षिण मुंबईपासून नवी मुंबईपर्यंतच्या परिसरात पसरला होता. कचराभूमीला खेटून बाहेरच्या बाजूला सुमारे चार-पाच एकर जागेमध्ये अनधिकृत झोपडपट्टी उभी राहिली असून ती हटवून तेथे मनोरंजन मैदान साकारण्याचा निर्णय पालिका आयुक्त अजय मेहता यांनी घेतला होता. त्यानुसार गेल्या आठवडय़ात या कारवाईला सुरुवात झाली. टप्प्याटप्प्याने एक हजारपैकी ४७६ झोपडय़ा तोडून झाल्यानंतर कारवाईला विरोध करण्यास सुरुवात केली.