‘सिटी सेंटर’मधील अग्नितांडवानंतर महापालिका प्रशासनाचा निर्णय

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : सिटी सेंटर मॉलमधील अग्नितांडवानंतर मुंबईतील सर्व मॉलमधील अग्निशमन यंत्रणेची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच त्याबाबतचे आदेश अग्निशमन दलाच्या केंद्रांना देण्यात येणार आहेत.

मुंबईमधील नागपाडा परिसरातील बेस्टच्या मुंबई सेंट्रल आगारासमोरील सिटी सेंटर मॉलला गेल्या आठवडय़ात भीषण आग लागली होती. या मॉलमध्ये मोबाइल आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंची मोठय़ा प्रमाणावर दुकाने होती. तसेच मॉलमधील अंतर्गत अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसल्यामुळे अग्निशमनात अनेक  अडथळे निर्माण झाले होते. गेल्या गुरुवारी रात्री लागलेल्या आगीने काही तासांतच अक्राळविक्राळ रूप घेतले. त्यामुळे अग्निशमन दलाने ‘ब्रिगेड कॉल’ जाहीर केला. अग्निशमन दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा मॉलला लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होता. मात्र इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमुळे आग धुमसत होती. सतत भडकणारी आग आणि पसरणारा धूर यांमुळे अग्निशमनात अनेक अडथळे निर्माण होत होते. तब्बल ३९ तासांनी या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र सोमवारी अग्निशमनाची प्रक्रिया पूर्ण झाली.

सिटी सेंटर मॉलला लागलेली आग विझविण्याच्या प्रक्रियेला तब्बल चार दिवस लागले. या घटनेची अग्निशमन दलाने गंभीर दखल घेतली आहे. सिटी सेंटर मॉलमधील अग्निशमन यंत्रणा योग्य प्रकारे कार्यान्वित झाली नाही. ही यंत्रणा कार्यान्वित असती तर वेळीच आगीवर नियंत्रण मिळविता आले असते. परिणामी, असे प्रकार भविष्यात घडू नयेत यासाठी मुंबईतील सर्वच मॉलमधील अग्निशमन यंत्रणेची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत लवकरच अग्निशमन दलाच्या सर्व केंद्रांना सूचना देण्यात येणार आहेत.

मॉल सुरू करण्यापूर्वी अग्निशमन दलाकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घ्यावे लागते. हे प्रमाणपत्र देण्यापूर्वी अग्निशमन दलाकडून मॉलची तपासणी केली जाते. तपासणीदरम्यान अग्निशमन यंत्रणेतील त्रुटी संबंधितांच्या निदर्शनास आणून दिल्या जातात. त्यात सुधारणा करण्याची सूचना केली जाते. संबंधित त्रुटी दूर केल्याचे निदर्शनास आल्यानंतर मॉलला ‘ना हरकत’ प्रमाणपत्र दिले जाते. असे असले तरी कालौघात अग्निशमन यंत्रणेची ठरावीक कालावधीनंतर तपासणी करणे गरजेचे असते. ती कार्यान्वित आहे की नादुरुस्त झाली आहे याची वेळोवेळी संबंधितांनी तपासणी करणे आवश्यक आहे. परंतु काही जण नियमितपणे अग्निशमन यंत्रणेची तपासणी करीत नाहीत. मग आगीची दुर्घटना घडल्यानंतर अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित होत नाही आणि मग सिटी सेंटर मॉलसारखी मोठी दुर्घटना घडते. त्यामुळे मॉलमधील अग्निशमन यंत्रणेबाबत कडक भूमिका घेण्यात येणार असल्याचे अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

सिटी सेंटर मॉलला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मॉलमधील अग्निशमन यंत्रणेची तपासणी करण्यात येईल.

– शशिकांत काळे, प्रमुख अग्निशमन अधिकारी