रस्ते, गल्ल्या, उद्याने, मंडया, पर्यटनस्थळी ‘स्वच्छता अभियान’ राबवण्याचे पालिकेचे फर्मान

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : मुंबईमध्ये येत्या १२ नोव्हेंबर रोजी ‘स्वच्छता अभियान’ राबविण्याचे फर्मान पालिका प्रशासनाने जारी केले असून या दिवशी लहान-मोठे रस्ते, छोटय़ा गल्ल्या, उड्डाणपूल, बस थांबे, तलाव, स्वच्छतागृहे, समुद्रकिनारे, नाले, रुग्णालये, उद्याने, पर्यटनस्थळे, वाणिज्यिक क्षेत्रे आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्याचा फतवा काढण्यात आला आहे. करोनाविषयक कामे, दिवाळीनिमित्त बाजारपेठांमध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्याचा व्याप असताना आता ‘स्वच्छता अभियाना’चा ताप पालिका अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी बनला आहे.

मुंबईत करोनाचा संसर्ग वाढू लागताच रुग्णांच्या व्यवस्थेसाठी पालिकेतील संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती. टाळेबंदी जारी असताना रुग्णांची व्यवस्था, रुग्णालये- करोना केंद्रातील सेवा-सुविधा, बेरोजगार-बेघरांच्या जेवणाचा पुरवठा आदी विविध कामांमध्ये पालिका अधिकारी, कर्मचारी व्यग्र होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने मुंबईतील टाळेबंदी शिथिल करण्यात आली. त्यामुळे करोनाविषयक कामांसोबत नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना पार पाडावी लागत आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच दिवाळीनिमित्त बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे करोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन बाजारपेठांमधील गर्दी नियंत्रित करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर येऊन पडली आहे. मुखपट्टीविना फिरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी मनुष्यबळ वाढविण्याचे आदेश नुकतेच प्रशासनाने दिले. त्याचीही तजवीज करण्यात अधिकारी व्यग्र आहेत, तर दुसरीकडे करोनाकाळात रखडलेल्या छोटय़ा-मोठय़ा प्रकल्पांची कामे पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. कामाचा व्याप प्रचंड वाढलेला असताना आता पालिकेच्या २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांच्या हद्दीत ‘स्वच्छता अभियान’ राबविण्याचे फर्मान काढण्यात आले.

पालिकेचे आदेश काय?

’ रस्ते, उड्डाणपुलांसोबतच रुग्णालये, उद्याने, पुतळे व स्मारक, बस थांबे, तलाव आणि स्वच्छतागृहे, प्रसिद्ध पर्यटनस्थळे, भाजी मंडई, वाणिज्यिक क्षेत्रे आदी ठिकाणी लोक सहभागातून अथवा कार्यरत शासकीय संस्थेच्या सभासदांमार्फत व्यापक प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवावी.

’ उद्याने आणि मंडयांमधील हरित कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी योग्य त्या तंत्रज्ञानाचा वापर करावा.

’ पालिका विभाग कार्यालये, सरकारी कार्यालये, मंडईमध्ये श्रमदान करून स्वच्छता मोहीम राबवावी.

’ रहिवासी कल्याण संघामार्फत सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करून वसाहती आणि आसपासचा परिसर स्वच्छ करावा.

’ शहरातील सर्व कुटुंबे, रहिवासी कल्याण संघ, गृहनिर्माण सोसायटय़ांमध्ये कचरा निर्माण होणाऱ्या ठिकाणीच त्याचे विलगीकरण करण्याच्या मोहिमेला सुरुवात करावी.

’ ‘स्वच्छ भारत अभियाना’त कचऱ्याचे वर्गीकरण आणि मुंबई कचरामुक्त करण्यासाठी स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांचीही मदत घ्यावी.

तयारीसाठी अवघे दोन दिवस

प्रशासनाने ‘स्वच्छता अभियाना’बाबत सोमवार, ९ नोव्हेंबर रोजी परिपत्रक जारी केले असून हे अभियान गुरुवारपासून लागू करण्यात येणार आहे. अवघ्या दोन दिवसांत या अभियानासाठी तयारी करावी लागणार आहे. करोनामुळे निर्माण परिस्थिती, संसर्गाची दुसरी लाट येण्याची भीती आणि दिवाळीनिमित्त खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये होत असलेली गर्दी आणि आता स्वच्छता मोहिमेचा फतवा यांमुळे पालिका अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.