प्रशासनाचे नवे परिपत्रक जारी

मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनाने अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त अन्य विभागांतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्के असणे बंधनकारक केले आहे. हे आदेश धुडकावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन कापण्याचे आदेश देण्यात आले असून पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबत परिपत्रकच जारी केले आहे. या परिपत्रकामुळे दूरवर राहणारे कर्मचारी अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.

करोनाबाधितांची संख्या वाढू लागताच राज्य सरकारने सर्व कंपन्यांना कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती पाच टक्क्य़ांवर आणली. मात्र पालिकेने आता अत्यावश्यक सेवा वगळता अन्य विभागांमध्ये ५० टक्के उपस्थिती सक्तीची केली आहे. सर्व खातेप्रमुखांना ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची नोंद सॅप प्रणालीत करण्याचे आदेश दिले आहेत. रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांची सॅप प्रणालीवर नोंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नव्या परिपत्रकामुळे पालिका कर्मचाऱ्यांना आठवडय़ातील किमान तीन-चार दिवस कार्यालयात उपस्थित राहावे लागणार आहे.

पालिकेतील अनेक कर्मचारी मुंबईबाहेर वास्तव्यास आहेत. सध्या लोकल सेवा बंद आहे. त्यामुळे कार्यालयात कसे पोहोचायचे, असा प्रश्न या कर्मचाऱ्यांना पडला आहे. कार्यालयात पोहोचू शकलो नाही आणि वेतन कापले तर घरखर्च कसा चालवायचा असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे. करोनामुळे निर्माण झालेली सध्याची स्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या ५० टक्के उपस्थितीबाबत जारी केलेल्या परिपत्रकाचा फेरविचार करावा, अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून होऊ लागली आहे.