भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि उद्यान (राणीचा बाग) परिसरातील भाऊ दाजी लाड वास्तुसंग्रहालय ताब्यात असलेल्या बजाज फाऊंडेशनला आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलादालन उभारण्यासाठी लगतचे खेळाचे मैदान, उद्यानाची जागा आणि त्यासोबत १०० कोटी रुपये देण्याचा घाट प्रशासनाने घातला असून, त्याविरोधात नगरसेवकांनी पालिका सभागृहात मंगळवारी गोंधळ घातला. या प्रकरणाचा खुलासा करण्यासाठी पालिका आयुक्त सीताराम कुंटे सभागृहात न आल्याने निषेधाच्या घोषणांनी गोंधळ टिपेला पोहोचला आणि अखेर महापौरांना सभागृह तहकूब करावे लागले.
 वास्तुसंग्रहालयाच्या शेजारी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलादालन उभारण्याचा फाऊंडेशनचा विचार आहे. त्यासाठी राणीच्या बागेला लागून असलेल्या खेळाच्या मैदानाचा वापर करण्यात येणार आहे. स्थायी समितीच्या परवानगीशिवाय हे मैदान आणि १०० कोटी रुपये फाऊंडेशनला देण्याचा घाट  घातला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी मंगळवारी पालिका सभागृहात एका निवेदनाद्वारे केला. हा निर्णय रद्द करावा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देवेंद्र आंबेरकर यांनी दिला.
भाऊ दाजी लाड वास्तुसंग्रहालय देखभालीसाठी ताब्यात मिळाल्यानंतर बजाज फाऊंडेशन मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी केला. स्थायी समितीला अंधारात ठेवून  रहा निर्णय घेतल्याबद्दल मनसेचे गटनेते संदीप देशपांडे, शिवसेना नगरसेवक रमाकांत रहाटे यांनी प्रशासनावर टीका केली. सर्वच  पक्षाच्या नगरसेवकांनी  निर्णयाला विरोध केला.अतिरिक्त आयुक्त विकास खरगे विरोधी पक्षनेत्यांच्या निवेदनास उत्तर देण्यासाठी उभे राहिले, मात्र पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी स्वत: सभागृहात येऊन निवेदन करावे, असा आग्रह नगरसेवकांनी धरला. महापौर स्नेहल आंबेकर यांनीही सीताराम कुंटे यांना सभागृहात येण्यासाठी निरोप पाठविला, मात्र आयुक्त सभागृहात न आल्याने नगरसेवकांनी प्रशासनाच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत गोंधळ केला. गोंधळामुळे पालिका सभागृहाचे कामकाज चालविणे अशक्य झाल्याने अखेर महापौर स्नेहल आंबेकर यांनी बैठक तहकूब केली.