मुंबईचे विद्रूपीकरण करणाऱ्या फलकांविरोधात महापालिका पुन्हा एकदा आक्रमक झाली असून अंधेरी परिसरातील ६९ फलक आणि त्यासाठी उभारण्यात आलेले ६३ आधारखांब काढून टाकण्यात आले. फलकांविरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

अंधेरी (पश्चिम) परिसरात पदपथांवर तसेच रस्त्याच्या कडेला मोठय़ा प्रमाणात अनधिकृत फलक लावण्यात आले होते. फलक लावण्यासाठी तेथे आधारखांबही उभारण्यात आले होते. ही कारवाई जुहू, जोगेश्वरी (प.), अंधेरी (प.), विलेपार्ले (प.), जुहू समुद्रकिनारा, ओशिवरा, वर्सोवा व वर्सोवा समुद्रकिनारा या ठिकाणी करण्यात आली. या परिसरातील रस्त्यांवर, पदपथांवर व सार्वजनिक परिसरांमध्ये अनधिकृतपणे होर्डिग्ज, पोस्टर, फलक इत्यादी लावण्यात आले होते. फलकांसाठी लावण्यात आलेल्या आधारखांबांमुळे पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत असल्याने कारवाई केली जात असल्याचे ‘के-पश्चिम’ विभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी सांगितले.