देशात करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे संपूर्ण देशात चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी हा निर्णय योग्य असला तरी लसीकरण मोहीम आणखी वेगाने करण्याची मागणी होत आहे. मात्र देशात करोना लशींचा तुटवडा जाणवत असल्याने अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांना लसीकरणासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. आता मुंबईत उद्या ( १५ मे) आणि १६ मे रोजी लसीककरण प्रक्रिया बंद ठेवण्यात आली आहे. याबाबतची माहिती मुंबई महापालिकेनं ट्विटरद्वारे दिली आहे.

‘मुंबईकरांनो, आम्ही सूचित करून इच्छितो की, १५ व १६ मे, २०२१ रोजी लसीकरण प्रक्रिया बंद ठेवण्यात येणार आहे. लसीकरणाविषयी पुढील माहिती आपल्याला लवकरच कळवण्यात येईल’, असं ट्वीट मुंबई महापालिकेनं केलं आहे.

मुंबईत गेल्या २४ तासात १६५७ रुग्णांची नोंद झाली आहे. तर २५७२ रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण ६ लाख ३१ हजार ९८२ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. करोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण मुंबईत ९२ टक्के इतकं आहे. सध्या मुंबईत एकूण ३७ हजार ६५६ करोना रुग्ण सक्रिय आहेत. तर रुग्ण दुप्पटीचा दर हा १९९ दिवसांवर पोहोचला आहे. ७ मे ते १३ मे दरम्यान रुग्णवाढीचा दर हा ०.३४ टक्के इतका होता.

दिलासा! राज्यात बाधितांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक! रिकव्हरी रेट ८८.६८ टक्क्यांवर!

करोना रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेनं लादलेल्या कठोर निर्बंधामुळे गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. सुप्रीम कोर्ट आणि नीती आयोगानं मुंबई करोना व्यवस्थापनाचं कौतुक केलं आहे. सध्या मुंबई मॉडेलची देशभरात चर्चा आहे.