मुंबईत जन्मणाऱ्या ४० टक्के बाळांचा जन्म महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये होत असतो, ही गोष्ट लक्षात घेऊन आज, बुधवारी सादर होणाऱ्या पालिका अर्थसंकल्पात पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये नवजात बालकांसाठी १०० ‘एनआयसीयू’ खाटांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सुरक्षित मातृत्व अनुदान योजनेचीही घोषणा करण्यात येणार असून आगामी वर्षांत कूपर रुग्णालयामध्ये पालिकेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या एकटय़ा शीव रुग्णालयात वर्षांकाठी पंधरा हजारांहून अधिक बालकांचा जन्म होतो. त्याचप्रमाणे केईएम, नायर आणि मॅटर्निटी होम्समध्ये जन्मणाऱ्या बाळांची संख्या मुंबईत दरवर्षी जन्मणाऱ्या बालकांच्या संख्येच्या ४० टक्केआहे. या बाळांचा जन्म सुरक्षितपणे व्हावा तसेच मातेलाही सर्वोत्तम उपचार मिळावे यासाठी अतिरिक्त पालिका आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी बुधवारी सादर होणाऱ्या पालिका अर्थसंकल्पात सुरक्षित मातृत्व योजनेचा समावेश केला आहे. याशिवाय कूपर, अजगावकर, सिद्धार्थ आणि शीव रुग्णालयात शंभर नवजात अर्भकांसाठी विशेष बेडची व्यवस्था केली आहे.
आगामी वर्षांत शीव रुग्णालयाचे संपर्ण नूतनीकरण करण्याची योजना आखण्यात आली असून आगामी पाच वर्षांत नव्याने रुग्णालय बांधण्यात येणार आहे. मुंबईतील कोणत्याही पंचतारांकित रुग्णालयाच्या तोडीस तोड असे हे रुग्णालय असेल, असा विश्वास पालिकेच्या ज्येष्ठ डॉक्टरांनी व्यक्त केला.

‘आरोग्य’दायी अर्थसंकल्प
*पश्चिम उपनगरांच्या धर्तीवर पूर्व उपनगरांतील पालिका रुग्णालयात एक हजार नव्या खाटा.
* रे रोड येथे खासगी-पालिका सहभागातून सुसज्ज कॅन्सर रुग्णालयाची उभारणी.
* येत्या पाच वर्षांत पालिकेचे पंचतारांकित रुग्णालय
पालिकेची सध्या केईएम,
शीव आणि नायर तसेच नायर दंतमहाविद्यालय अशी चार वैद्यकीय महाविद्यालये असून ऑगस्टपासून कूपर रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल.