पालिकेचे आवाहन

मुंबई : करोनाबाधित व्यक्तींच्या मृतदेहाची चित्रफित प्रसारित करू नये, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. या चित्रफितींचा रुग्णालयात दिवसरात्र झटणाऱ्या वैद्यकीय यंत्रणेच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनोबलावर नकारात्मक परिणाम होण्याची भीती पालिकेने व्यक्त केली आहे.

करोना विषाणूचा सामना सध्या सगळे जग करीत आहे. देशाच्या तुलनेत मुंबईत तपासण्यांची संख्या सर्वाधिक आहे, तर सर्वाधिक संसर्गही मुंबईतच झाला आहे. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिकेच्या विविध रुग्णालयांतील डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय हे दिवस-रात्र रुग्णसेवा करीत आहेत. पालिकेच्या इतर खात्यांचेही कर्मचारीही अविरतपणे सेवा देत आहेत. मात्र, घटनेची कारणमीमांसा समजून न घेता रुग्णालयातील मृतदेहांची चित्रफीत प्रसारित झाल्या. ही बाब रात्रंदिवस काम करत असणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मनोबलाचे खच्चीकरण आहे, असे मत पालिकेने व्यक्त केले आहे. या अशा प्रकारांबाबत संबंधितांना काळजी घेण्याचे निर्देश यापूर्वीच दिलेले असून यंत्रणेकडून तशी सतर्कता बाळगण्यात येत असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

वैद्यकीय उपचारांदरम्यान काही रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. रुग्णाच्या मृत्यूनंतर निर्धारित प्रक्रिया पूर्ण होण्यास काही कालावधी जातो. संबंधित रुग्णाचा मृत्यू झाल्याची अंतिम नोंद घेतल्यानंतर संबंधित मृतदेह वेष्टनात बंद गुंडाळला जातो. तसेच मृत्यूची कल्पना त्यांच्या कुटुंबीयांना दिली जाते. काही वेळा नातेवाईकांकडून मृतदेह ताब्यात घेण्यात वेळ होतो. अडचणी उद्भवल्या नाहीत तरी सर्व प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह देण्यास किमान १ तासांचा वेळ जातो.

दरम्यान मृतदेहामुळे करोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी तो उपचार सुरू असलेल्या खाटेवरच ठेवणे आवश्यक असते. तसेच ही प्रक्रिया राबवित असताना रुग्णालय योग्य ती खबरदारी घेत असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.