दंडवसुलीसाठी महापालिका प्रशासनाकडून ‘मार्शल’ची नियुक्ती

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : करोना संसर्ग रोखण्यासाठी जारी केलेल्या नियमांचे सार्वजनिक ठिकाणी पालन न करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या ‘के-पश्चिम’ विभागाने ‘मार्शल’ची नियक्ती केली आहे. मात्र दंडात्मक कारवाईच्या आडून गैरप्रकार घडू नये यासाठी कंत्राटी पद्धतीऐवजी पालिकेच्या सेवेतील कर्मचाऱ्यांचीच ‘मार्शल’ म्हणून नेमणूक करण्यात आली असून नागरिकांची लुबाडणूक केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित मार्शलविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. वेळप्रसंगी त्याला आपली नोकरीही गमवावी लागण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक ठिकाणी वावरताना मुखपट्टीचा वापर बंधनकारक आहे. याचे पालन न करणाऱ्याविरु द्ध दंडात्मक कारवाई केली जाते. आता टाळेबंदी टप्प्याटप्प्याने शिथिल होत असून रस्त्यावर नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे. अंधेरी पश्चिम भागात मुखपट्टीशिवाय फिरणारे, मुखपट्टी योग्य पद्धतीने न वापरणारे आणि सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यासाठी ‘के-पश्चिम’ विभागाने सहा ‘मार्शल’ची नियुक्ती केली आहे. अंधेरी पश्चिम आणि आसपासच्या परिसरात कारवाई करण्यासाठी तीन पथके सज्ज करण्यात आली आहेत. एका पथकात दोन ‘मार्शल’ आणि एका सुरक्षारक्षकाचा समावेश करण्यात आला आहे. या पथकांना परिसर नेमून देण्यात आले असून त्यांनी कारवाईला सुरुवात केली आहे.

घनकचरा व्यवस्थापन विभागाने मुंबईत अस्वच्छता करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यासाठी ‘क्लिन-अप मार्शल’ योजना सुरू केली होती. या योजनेचे कंत्राट सामाजिक संस्थांना देण्यात आले होते. सामाजिक संस्थांनी कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेले ‘क्लिन-अप मार्शल’ मुंबईत अस्वच्छता करणाऱ्यांकडून दंड वसूल करीत होते. काही ठिकाणी नागरिकांना पावती न देताच पैसे उकळण्याचे प्रकार घडले होते. अशा काही प्रकरणांत पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मुखपट्टी न वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी नियुक्त

केलेल्या ‘मार्शल’कडून असे प्रकार घडू नये यासाठी ‘के-पश्चिम’ विभागाने काळजी घेतली आहे. कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याऐवजी पालिकेच्या सेवेतील कायम कर्मचाऱ्यांची ‘मार्शल’पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मार्शलची नियुक्ती का?

साफसफाई करणे, कचरा कचराभूमींपर्यंत वाहून नेणे, निर्जंतुकीकरण करणे, कचराभूमींचे व्यवस्थापन आदी कामांची जबाबदारी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे आहे. करोनाबाधितांच्या घरांचे निर्जंतुकीकरण करण्याची आणि मुखपट्टी न वापरणाऱ्या आणि सामाजिक अंतराचा नियम पायदळी तुडविणाऱ्या मुंबईकरांवर कारवाईची जबाबदारीही याच विभागावर आहे. मात्र मनुष्यबळाअभावी ही कारवाई परिणामकारकरीत्या होत नसल्याचे दिसून आले आहे.

रस्त्यावर नागरिकांची वर्दळ वाढत आहे. करोनापासून स्वसंरक्षण करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टीचा वापर आणि सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करणे हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनातील एक भाग बनायला हवा. नागरिकांनी या बाबींचे स्वत:हून पालन केल्यास यंत्रणांवरचा ताणही कमी होईल.

– विश्वास मोटे, साहाय्यक आयुक्त, ‘के-पश्चिम’