कफ परेड पार्कच्या निर्मितीसाठी सल्लागार निश्चित, स्थायी समितीच्या मंजुरीची प्रतीक्षा

मुंबई : मेट्रो रेल्वे आणि मुंबई किनारा मार्ग प्रकल्पामध्ये निर्माण होणाऱ्या राडारोडय़ाची विल्हेवाट लावण्यासाठी, पर्यावरणाचे संतुलन राखण्याकरिता, तसेच देश-विदेशी पर्यटकांसाठी एक पर्यटनस्थळ निर्माण करण्याच्या उद्देशाने कफ परेड येथील बॅकबे रिक्लमेशनजवळ किनाऱ्यालगत समुद्रात तब्बल ३०० एकर क्षेत्रफळावर भराव टाकून उद्यान उभारण्याचा पालिकेचा मानस आहे. या प्रकल्पासाठी तयार केलेल्या मूल्यमापन अहवालाचा अभ्यास करणे, अंमलबजावणी अहवाल आणि निविदा मसुदा तयार करण्यासाठी पालिकेने टाटा कन्सल्टिंग इंजिनीअर्स या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र याला अद्याप स्थायी समिती आणि पालिका सभागृहाची मंजुरी मिळणे बाकी आहे.

कफ परेड येथील बॅकबे रिक्लमेशनजवळ किनाऱ्यालगत समुद्रामध्ये ३०० एकर क्षेत्रफळावर भराव टाकून उद्यान साकारण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यासाठी पालिकेने राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था व राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था या दोन संस्थांची प्रकल्पाच्या मूल्यमापन अभ्यासासाठी नियुक्ती केली होती. या दोन्ही संस्थांनी आपला अहवाल पालिकेला सादर केला आहे. या संस्थांनी तयार केलेल्या अहवालाचा अभ्यास करणे, अंमलबजावणी अहवाल आणि आवश्यक ते अहवाल तयार करणे, निविदेचा मसुदा तयार करणे आदी विविध कामांसाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेत निविदा मागविल्या होत्या. निविदा प्रक्रियेअंती पालिका प्रशासनाने टाटा कन्सल्टिंग इंजिनीअर्स या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

मुंबईमध्ये सध्या ठिकठिकाणी मेट्रो रेल्वेची कामे युद्धपातळीवर सुरू आहे. मेट्रो प्रकल्पाच्या भुयाराचे खोदकाम आणि अन्य प्रकल्पांतून मोठय़ा प्रमाणावर राडारोडा निर्माण होत आहे. कफ परेडजवळील समुद्रात हा राडारोडा टाकून भरावभूमी उभारून त्यावर उद्यान निर्माण करण्याचा पालिकेचा विचार आहे. या उद्यानात रस्ते बांधणे, जेट्टी उभारणे, जलमार्गिका तयार करणे इत्यादी कामेही करण्यात येणार आहेत. निविदा प्रक्रियेअंती सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात येणाऱ्या कंपनीला मूल्यमापन अहवालाचा अभ्यास करावा लागणार असून त्याच्यावर आधारित प्रस्तावित विकासकामांचा अंमलबजावणी अहवाल तयार करणे, विस्तृत प्रकल्प अहवाल आणि प्रकल्पाचा वास्तविकता अहवाल तयार करावा लागणार आहे. त्याचबरोबर प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी निविदा प्रक्रियेचा मसुदाही या कंपनीला तयार करावा लागणार आहे. या प्रकल्पासाठी बृहद् योजना तयार करणे, परवानग्या, परवाने मिळविण्यासाठी मदत करणे, प्रकल्पाच्या विकासासाठी विविध पर्याय सुचविणे आणि आराखडे तयार करण्यासह त्रिमितीय दृष्य चित्रफीत तयार करणे इत्यादी कामांची जबाबदारी सल्लागारावर सोपविण्यात येणार आहे. भविष्यात उद्यानात होणारी पर्यटकांची वर्दळ, वाहतूक व्यवस्थापन, पाणी, वीज, सांडपाणी व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था आदींचा अभ्यास करण्याची, तसेच त्याबाबत प्रकल्प अहवाल तयार करण्याची जबाबदारी सल्लागार कंपनीवर राहणार आहे.

’ मुंबईत ठिकठिकाणी सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमधून निर्माण होणारा ‘राडारोडा’ कफ परेड येथील समुद्रात टाकून तेथे भरावभूमी करण्याचा पालिकेचा विचार आहे.

’ या ३०० एकर क्षेत्रफळाच्या भरावभूमीवर उद्यान, क्रीडांगण उभारण्याचे २०३४च्या विकास आराखडय़ात नियोजन करण्यात आले आहे.