शहरांतील मोठय़ा नाल्यांतून उपसण्यात येणारा गाळ ठाणे तालुक्यातील अडवली भुताली आणि भिवंडी तालुक्यातील पाये गावात टाकण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आल्यानंतर स्थायी समितीच्या सोमवारच्या बैठकीत मुंबई शहरांतील मोठय़ा नाल्यातून गाळ उपसून त्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रस्तावाला स्थायी समिती अध्यक्षांनी मंजुरी दिली.
मोठय़ा नाल्यांच्या सफाईसाठी कंत्राटदारांकडून प्रतिसाद न मिळाल्याने चार वेळा निविदा काढण्याची वेळ प्रशासनावर ओढवली होती. चौथ्या वेळी केवळ एन. ए. कंन्स्ट्रक्शन कंपनीनेच प्रतिसाद दिल्याने हे काम त्यांना देण्याचे निर्णय प्रशासनाने घेतला. गेल्या आठवडय़ात स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव सादर केला होता.
हा प्रस्ताव पुकारताच भाजप नगरसेवक दिलीप पटेल यांनी गाळ कुठे टाकणार याचे स्पष्टीकरण मिळेपर्यंत हा प्रस्ताव राखून ठेवण्याची मागणी केली. सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनीही याबाबत प्रशासनाकडे स्पष्टीकरणाची विचारणा केली.
पावसाळा तोंडावर आल्यामुळे नालेसफाईची कामे यापूर्वीच सुरू होणे गरजेचे होते. मात्र नगरसेवकांच्या हट्टामुळे हा प्रस्ताव गेल्या आठवडय़ात राखून ठेवला गेला.
शहरांतील मोठय़ा नाल्यांमधील गाळ अडवली भुताली आणि पाये गावातील भूखंडावर टाकण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी दिली आणि त्यानंतर या प्रस्तावाला स्थायी समिती अध्यक्षांनी मंजुरी दिली. त्यामुळे शहरांतील नाल्यांच्या सफाईचा मार्ग मोकळा झाला आहे.