संदीप आचार्य 
मुंबई: करोनाचे मुंबईतील रुग्ण व मृत्यूचे प्रमाण लक्षात घेऊन एकीकडे रेमडीसीवीरसारखी अत्यावश्यक औषधे खरेदी करतानाच दुसरीकडे प्लाझ्मा उपचारांवर भर देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. मात्र करोनातून बरे झालेले रुग्ण प्लाझ्मा दान करण्यासाठी फारसे पुढे येत नसल्याने या उपचाराला म्हणावी तेवढी गती येत नाही. यासाठी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी पुढील आठवड्यात ‘महा प्लाझ्मा दान शिबीरा’चे आयोजन केले आहे. या प्लाझ्मा शिबीरात ३०० पोलीस प्लाझ्मा दान करणार असून अशाप्रकारचे हे पहिलेच ‘प्लाझ्मा दान शिबीर’ ठरेल.

यापूर्वी रक्तदान शिबीर, नेत्रदान तसेच अवयवदान शिबीर पासून पुस्तक- वह्या वाटपापर्यंत अनेक शिबीरे झाली आहेत व होत असतात. तथापि करोनाच्या लढाईत रुग्णांचे जीव वाचविण्यात प्लाझ्मा उपचारपद्धीताचा उपयोग होते असे लक्षात आल्यानंतर देशभरातील वेगवेगळ्या राज्यातील रुग्णालयात करोना रुग्णांना प्लाझ्मा देण्याचे काम सुरु झाले आहे. यासाठी पोलिसांचे प्लाझ्मा दान महाशिबीर ही अभिनव कल्पना राबविण्याचा निर्णय महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी घेतला. यासाठी नियोजन तयार झाले असून ३०० पोलीस ज्यांना यापूर्वी करोना होऊन गेला आहे ते प्लाझ्मा दान करणार आहेत. याबाबत आयुक्त चहल यांना विचारले असता, पालिकेच्या केईएम, शीव व नायर आदी रुग्णालयात करोना रुग्णांना प्लाझ्मा देण्याची व्यवस्था आहे. राज्यातही पहिल्या टप्प्यात आयसीएमआरने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी सलग्न रुग्णालयांना करोना रुग्णांना प्लाझ्मा उपचार करण्यास परवानगी दिली आहे. मात्र त्या तुलनेत करोनातून बरे झालेले लोक पुरेशा प्रमाणात प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येत नाहीत.

यातूनच करोनातून बरे झालेल्या पोलिसांच्या माध्यमातून प्लाझ्मा दान शिबीर घेण्याची संकल्पना आकाराला आली. धारावी पोलीस ठाण्यातील करोनातून बरे झालेल्या १५० पोलिसांच्या प्लाझ्मा दानाचे नियोजन शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केले तर अन्य काही पोलीस ठाण्यातून आणखी १५० पोलिसांनी प्लाझ्मा दानाची तयारी दाखवली आहे. यातूनच हे महा प्लाझ्मा दान शिबीर होणार आहे. खरेतर खूप मोठ्या प्रमाणात पोलीस प्लाझ्मा दानाला तयार आहेत. मात्र पहिल्या टप्प्यात ३०० जणांकडूनच प्लाझ्मा घेतला जाणार असल्याचे आयुक्त चहल म्हणाले.

अफ्रेरीस मशीनद्वारे रक्तदानातून प्लाझ्मा वेगळा काढण्याची प्रक्रिया केली जाते. यात दात्याला कोणताही त्रास होत नसून रक्तदानासारखीच ही एक प्रक्रिया असल्याचे ‘राज्य रक्त संक्रमण परिषदे’चे सहाय्यक संचालक डॉ. थोरात यांनी सांगितले. ‘आयसीएमआर’ व ‘डिजीसीआय’ यांनी राज्यात अफ्रेरीस मशीन असलेल्या काही खाजगी रुग्णालयांनाही प्लाझ्मा उपचाराची परवानगी दिली असून यात दात्याच्या रक्तातील प्लाझ्मा वेगळा काढून पांढर्या व लाल रक्तपेशी पुन्हा दात्याच्या शरीरात पाठवले जातात. साधारणपणे एका दात्याकडून ५०० एमएल प्लाझ्मा घेतला जातो. करोनातून बरे झालेल्या दात्याच्या शरीरात प्रतिपिंड म्हणजे अॅण्टिबॉडीज तयार होतात व त्यासाठी करोनाच्या पहिल्या व दुसर्या टप्प्यातील रुग्णाला प्लाझ्मा दिल्यास त्याच्या शरीरात प्रतिकारशक्ती तयार होऊन रुग्ण बरा होण्यास मदत होते असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अतिगंभीर रुग्णांना याचा उपयोग होतो याबाबत ठोस संशोधनात्मक निष्कर्ष उपलब्ध नाहीत. मात्र अजूनही करोनाची लस उपलब्ध झालेली नसल्याने रुग्ण बरे होण्यासाठी सर्व उपचार पद्धतींचा वापर सध्या जगभरातच केला जात आहे.

जगभरात जवळपास ८० संस्था लस तयार करण्यासाठी झटत असून सध्या प्लाझ्मा उपचार पद्धतीकडे रुग्णांचा कल वाढल्याचेही काही डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र यासाठी करोनातून बरे झालेले दाते मिळणे गरजेचे असून १८ ते ६० वयोगटातील व ज्यांचे वजन ५० किलोपेक्षा जास्त आहे असे बरे झालेले करोना रुग्ण प्लाझ्मा दान करू शकतात. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या चार प्रमुख रुग्णालयातील प्लाझ्मा उपचाराला गती देण्यासाठी तसेच जनजागृती म्हणून या ‘महा प्लाझ्मा दान शिबीरा’चे आयोजन केल्याचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सांगितले.