पश्चिम द्रुतगती मार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने गोरेगावमधील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरला अंधेरी-दहिसर मेट्रोचं काम पूर्ण होईपर्यंत कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन केलं जाऊ नये अशी सूचना दिली आहे. गोरेगावमधील मैदानात आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांमुळे पश्चिम द्रुतगती मार्गावर आधीच होणाऱ्या वाहतूक कोंडीत अजून भर पडत असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

मुंबईत सुरु असलेल्या वाहतूक पायाभूत सुविधा प्रोजेक्टमुळे तात्पुरत्या स्वरुपासाठी बंद करावं लागणारं हे दुसरं मोठं ठिकाण आहे. याआधी बीकेसीमधील एमएमआरडीए मैदानावर कार्यक्रम घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन टर्मिनस आणि मेट्रो-२ च्या कामासाठी ही बंदी घालण्यात आली आहे.

मेट्रोचं काम सुरु झाल्यापासून गर्दीच्या वेळी गोरेगावमध्ये वाहनांचा वेग ताशी १० किमी असतो. ‘मोठे कार्यक्रम असल्यास वाहतुकीची अवस्था अत्यंत वाईट असते. अनेक वाहनं एक्झिबिशन सेंटरमध्ये जात असतात. मात्र आतमध्ये पार्किंगसाठी जास्त जागा नसल्याने बाहेर वाहतुकीवर परिणाम होतो. आम्ही महापालिका आणि बॉम्बे एक्झिबिशन सेंटरला यासंबंधी पत्र लिहिलं आहे’, अशी माहिती सहपोलीस आयुक्त (वाहतूक) अमितेश कुमार यांनी दिली आहे.

मेट्रो-७ चं काम २०१९ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. याचा अर्थ मुंबईतील सर्वात मोठं कार्यक्रमस्थळ एका वर्षाहून जास्त काळ बंद असणार आहे. दरम्यान बॉम्बे एक्झिबिशन सेंटरने यासंबंधी काहाही भाष्य करण्यास नकार देत सोमवारी अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आलं असल्याचं सांगितलं आहे.