छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी पूल कोसळून दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत चारजण ठार तर ३० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. आता याप्रकरणी आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. सुरुवातीला या पुलाचं ऑडिटच झालं नसल्याचा आरोप झाला होता. मात्र शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मात्र हा आरोप खोडून काढला आणि पुलाचं ऑडिट झालं असून या पुलाच्या फक्त डागडुजीचा प्रस्ताव होता असं म्हटलं आहे. तर भाजपाचे नेते राज पुरोहित यांनी मात्र पुलाचे ऑडिट राज्य सरकारने नाही तर मुंबई महापालिकेने केले होते असं म्हटलं आहे. तसेच ज्या इंजिनिअरने हे ऑडिट केले त्याच्यावर कारवाई व्हायला हवी अशी मागणीही राज पुरोहित यांनी केली आहे.

आज संध्याकाळी साडेसातच्या सुमारास सीएसएमटी जवळचा पूल कोसळून ४ जण ठार झाले आहेत तर ३० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. ही घटना घडताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. नगरसेवक, आमदार, खासदार यांनीही या ठिकाणी भेटी दिल्या. तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही या ठिकाणी भेट दिली. या सगळ्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा एक टॅक्सी या ठिकाणी उभी होती. या टॅक्सीत कुणीही नव्हतं. या टॅक्सीचा दुर्घटनेत चुराडा झाला आहे. या घटनेत एकूण ४ जण ठार झाले असून ३० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. जखमी रूग्णांना जीटी रूग्णालय, कामा रुग्णालय, सायन रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींच्या उपचारांचा सगळा खर्च शासनातर्फे करण्यात येईल असं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. दरम्यान भाजपा नेते राज पुरोहित यांनी ज्या इंजिनिअरने ऑडिट केलं त्याच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.