जागतिक मधुमेह प्रतिबंध दिनानिमित्त मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘मधुमेह नियंत्रित, राहा सुरक्षित’ ही मोहीम हाती घेतली आहे. महिनाभर चालणाऱ्या या मोहिमेंतर्गत जाणीव-जागृती विषयक विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. तसेच अनेक ठिकाणी मधुमेहविषयक जनजागृतीपर माहिती देणारे फलकदेखील लावण्यात येणार आहेत.

मधुमेह हा अत्यंत धीम्या गतीने शरीरावर हल्ला करून अवयव निकामी करत असतो. त्यामुळे मधुमेहास दूर ठेवण्यासाठी दररोज पुरेसा व्यायाम करा आणि संतुलित आहार घ्या, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केले आहे. आपण गेली ३० वर्षे दररोज नियमितपणे व्यायाम करत असल्यामुळेच मधुमेहाला दूर ठेवू शकल्याचेही आयुक्तांनी सांगितले आहे.

मधुमेही रुग्णांमध्ये कोरोनाचा तीव्र संसर्ग होतो. त्याचबरोबर कोरोना मृत्यूचे प्रमाणही मधुमेही व्यक्तींमध्ये सर्वाधिक आहे, असे दिसून आले आहे. तसेच उपचार न केल्यास मधुमेहामुळे अंधत्व, अंगच्छेदन, मूत्रपिंड निकामी होणे, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात यासारखे दुष्परिणामही होतात. परंतु ८० टक्के मधुमेह (प्रकार २) आणि हृदय विकार हे आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करून रोखता येतात.

जीवनशैलीविषयी जागरुकता वाढविण्यासाठी व निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी १४ नोव्हेंबर २०२० रोजीच्या जागतिक मधुमेह प्रतिबंध दिनानिमित्त महानगरपालिकेने ‘मधुमेह नियंत्रित, राहा सुरक्षित’ ही मोहीम सुरू केली आहे. ‘आयडीएफ’च्या निर्देशानुसार या वर्षांच्या मोहिमेचा आशय ‘परिचारिका आणि मधुमेह’ असा आहे. बृहन्मुंबई महापालिकेद्वारे मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची काळजी, प्रतिबंध आणि उपचार यामध्ये परिचारिकेच्या भूमिकेस प्रोत्साहन देण्यात येत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १४४ दवाखान्यांमध्ये मधुमेहाबाबत समुपदेशक सेवा उपलब्ध आहे. तर ५२ दवाखान्यांमध्ये दृष्टिपटलासाठी तपासणी सेवा असून आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी संदर्भित करण्याचीही व्यवस्था महानगरपालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये उपलब्ध आहे, असे पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

देशात ७.७ कोटी मधुमेही रुग्ण

इंटरनॅशनल डायबेटीस फेडरेशन (आयडीएफ)च्या अंदाजानुसार, भारतात मधुमेहाचे ७७ दशलक्ष (७.७ कोटी) रुग्ण आहेत आणि सन २०४५ पर्यंत हे प्रमाण दुप्पट होईल, असाही अंदाज आहे. ‘आयसीएमआर’च्या सर्वेक्षणानुसार मुंबईमध्ये मधुमेहाचे प्रमाण १०.९० टक्के आणि ‘मधुमेहपूर्व स्थिती’चे प्रमाण १५ टक्के इतके आहे. हे प्रमाण राष्ट्रीय आकडेवारीच्या तुलनेत अधिक आहे.

राज्यातील २४ टक्के व्यक्ती मधुमेहाच्या उंबरठय़ावर

* पुणे : राज्यातील तब्बल २४ टक्के व्यक्ती ‘प्री-डायबेटिस मेलिटस’ असल्यामुळे पुरेशी खबरदारी आणि प्रतिबंधात्मक उपाय न केल्यास त्यांना मधुमेह होण्याची शक्यता आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मधुमेहाच्या उंबरठय़ावर असलेल्या व्यक्तींचे प्रमाण अधिक आहे.

* इंडस हेल्थ प्लस या प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा देणाऱ्या कंपनीने जून २०१९ ते ऑक्टोबर २०२० या काळात केलेल्या तपासण्यांच्या आधारे हा अभ्यास केला आहे. पुणे, मुंबईस नवी मुंबई, ठाणे, अहमदनर, रत्नागिरी आणि नाशिक या शहरांमध्ये करण्यात आलेल्या तपासण्यांच्या अभ्यासावरुन हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

* १८ वर्षांवरील ९२९४ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. पुणे शहरातील १४३६ तर मुंबईमधील २९४१ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यांमध्ये ६१ टक्के पुरुष आणि ३९ टक्के महिलांचा समावेश आहे. व्यक्तींचे सरासरी वय ४५ वर्षे एवढे आहे. बहुसंख्य व्यक्तींमध्ये ताणतणाव, लठ्ठपणा, सोडायुक्य पेये, निकृष्ट आहार, व्यायामाचा अभाव आणि आहारातील साखरेचा अतिरेक ही मधुमेहाची शक्यता निर्माण करणारी प्रमुख कारणे आहेत. महिलांच्या तुलनेत मधुमेहाची शक्यता असलेले पुरुष अधिक आहेत.