|| प्रसाद रावकर

प्रत्येकी सरासरी दीड-दोन लाख थकीत

पालिकेने मदतीचा हात दिल्यानंतर सावरत असलेल्या ‘बेस्ट’ उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या नव्या वेतन करारास अंतिम रूप यावे यासाठी कामगार संघटनांनी हालचाल सुरू केली आहे. मात्र यापूर्वी केलेल्या वेतन करारातील थकबाकी सेवा निवृत्त झाल्यानंतर पदरी न पडल्यामुळे संतप्त झालेले सुमारे तीन हजारांहून अधिक कर्मचारी प्रशासन आणि कामगार संघटनांच्या विरोधात संप पुकारण्याच्या तयारीत आहेत. वृद्धापकाळ आणि आजारपणात आपल्या हक्काचे पैसे मिळत नसल्याने निवृत्त कर्मचारी अस्वस्थ आहेत.

‘बेस्ट’ डबघाईला आल्याने पालिकेने बेस्टला कर्जमुक्त करण्यासाठी ११३६ कोटी रुपये, तर भाडेतत्त्वावरील बसगाडय़ा घेण्यासाठी आणि अन्य कामासाठी ६०० कोटी रुपये देण्याची तयारी सुरू केली आहे. आता कामगार संघटनांनी ‘बेस्ट’च्या कर्मचाऱ्यांचा वेतन करार करण्यात यावा, यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी संपाचा इशाराही देण्यात आला होता. मात्र ‘बेस्ट’मधून २०१३ नंतर आणि २०१६ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्यांचा प्रश्न कायम असून त्यांना दिलासा देण्याकरिता संघटनांकडून काहीच प्रयत्न केले जात नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

या कर्मचाऱ्यांचा २०१२ मध्ये वेतन करार झाला. मात्र २०१३ ते २०१६ या काळात सेवानिवृत्त झालेले तब्बल ३७७६ कर्मचारी वेतन करारानुसार मिळणाऱ्या थकबाकीपासून वंचित आहेत. त्यांची सरासरी दीड ते दोन लाख रुपये थकबाकी ‘बेस्ट’कडे आहे. त्यांची थकबाकीची रक्कम २५ कोटी ५१ लाख एक हजार २३९ इतकी असून ती मिळावी यासाठी कर्मचाऱ्यांनी बेस्ट व्यवस्थापकांशी पत्रव्यवहार केला. पण पाच वर्षे लोटली तरीही निवृत्तांच्या पदरात थकबाकीची रक्कम पडलेली नाही. निवृत्तीनंतर कामगार संघटना आपल्या प्रश्नाकडे लक्षच द्यायला तयार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया निवृत्त कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. पालिका आयुक्त, बेस्ट महाव्यवस्थापक आणि कामगार संघटनांनी आपल्या मागणीकडे गांभीर्याने पाहिले नाही, तर आझाद मैदानावर मोर्चा काढावा लागेल, असा निर्वाणीचा इशारा निवृत्त कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

बहुसंख्य कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचारांची नितांत गरज आहे. हे पैसे वेळीच मिळाले तर त्यांना उपचार घेणे शक्य होईल. त्यामुळे पालिका, बेस्टने तातडीने हक्काचे पैसे मिळवून द्यावे.    – शामराव कदम, निवृत्त कर्मचारी