अर्थसंकल्प ३७ हजार कोटींवरून ३२ हजार कोटींचा

मुंबई महापालिका निवडणुकीत पालिकेचा ‘अवास्तववादी’ अर्थसंकल्प खूप गाजला होता. भांडवली कामांवरील तरतुदींचा वापर होत नसल्यावरून शिवसेनेची कोंडी करण्याचे प्रयत्न करण्यात आले. या पाश्र्वभूमीवर येत्या २९ मार्च रोजी सादर होणारा पालिकेचा अर्थसंकल्प हा संपूर्ण वास्तववादी असणार आहे. गेल्या वर्षी पालिकेचा अर्थसंकल्प ३७ हजार कोटींचा होता त्याऐवजी यंदा प्रत्यक्षात होणाऱ्या कामांवरील खर्चाचा अंदाज बांधून अर्थसंकल्प सादर होणार असल्यामुळे तो ३० ते ३२ हजार कोटींचा असेल असे पालिकेतील उच्चपदस्थांनी सांगितले.

मुंबई महापालिकेच्या गेल्या काही वर्षांत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात रस्ते, पाणीपुरवठा, मलनिस्सारण प्रकल्पांपासून केंद्र अथवा राज्य शासनाच्या परवानग्यांची आवश्यकता असलेल्या अनेक भांडवली प्रकल्पांचे खर्च गृहीत धरून कोटय़वधी रुपयांचे अर्थसंकल्प सादर करण्यात येत होते. यासाठी उत्पन्नाच्या बाजूलाही जकात, मालमत्ता करापासून विविध करांच्या माध्यमातून मोठे उत्पन्नाचे आकडे दाखविण्यात येत असत. परिणामी गेल्या वर्षीचा पालिकेचा अर्थसंकल्प तब्बल ३७ हजार कोटी रुपयांचा दाखविण्यात आला. महापालिका निवडणुकीत हाच मुद्दा कळीचा ठरून भाजपने शिवसेनेवर जोरदार टीका केली. भाडवली कामांसाठी दाखविण्यात आलेल्या १२ हजार कोटींपैकी निम्मीही रक्कम खर्च झाली नसल्याची टीका करून आर्थिक नियोजन योग्य प्रकारे होत नसल्याची टीका केली गेली.

या पाश्र्वभूमीवर महापालिकेत सत्तेवार आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम शिवसेनेचा वचननामा अंमलबजावणीचा कालबद्ध कार्यक्रम राबविण्यास सांगितले. तसेच पालिकेचा अर्थसंकल्प हा वास्तववादी असला पाहिजे, अशी भूमिका मांडली. त्यानुसार महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांना १७ मार्च रोजी पत्र पाठवून मुंबई सागरी मार्ग, मलजल प्रक्रिया प्रकल्प,गारगई- पिंजाळ प्रकल्प असे ज्या प्रकल्पांना केंद्र अथवा राज्य शासनाच्या मंजुरीला वेळ लागतो त्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करताना वास्तवदर्शीपणे करावी, अशी भूमिका मांडली आहे. तसेच प्रस्तावित कामांसाठी तरतूद केल्यानंतर जर प्रकल्प वेळेत सुरू होणार नसेल तर सदर तरतुदीची उचल करण्यात येऊ नये जेणेकरून अर्थसंकल्पाचा आकार विनाकारण फुगणार नाही. भांडवली कामांसाठी केलेली तरतूद निश्चित वेळेत वापरली जाईल याकडेही कटाक्षाने लक्ष देण्यास महापौरांनी आयुक्तांना सांगितले आहे.

भाजपची पारदर्शकतेची मागणी आणि शिवसेनेची वास्तवदर्शी अर्थसंकल्पाची मागणी लक्षात घेऊन पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी प्रत्यक्ष खर्चावर आधारित कोणतीही आकडेवारी न फुगवता अर्थसंकल्प मांडण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे गेल्या वर्षीच्या ३७ हजार कोटींऐवजी अर्थसंकल्पाचे आकारमान ३० ते ३२ हजार कोटींवर येण्याची शक्यता ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यात नोटाबंदीमुळे तसेच बांधकामाला बसलेल्या फटक्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात बसलेल्या फटक्याचाही समावेश आहे.

अर्थसंकल्पीय अंदाज व सुधारित अंदाज

  • २०१३-१४ अर्थसंकल्पीय अंदाज-२७,५७८.६७ तर सुधारित अंदाज-२४,४११ कोटी
  • २०१४-१५ अर्थसंकल्पीय अंदाज-३१,१७८.१८ कोटी तर सुधारित अंदाज-२६,३३६.७५ कोटी
  • २०१५-१६ अर्थसंकल्पीय अंदाज- ३३,५१९.१५ कोटी तर सुधारित अंदाज -२६,४७९.६८ कोटी