करोनाच्या पार्श्वभूमीवर अपेक्षेप्रमाणे मुंबई महापालिकेने शहरातील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणावर भर दिला आहे. पालिका क्षेत्रातील आरोग्य सुविधांच्या उभारणी, विकासासाठी भांडवली कामांसाठी १२०६ कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा आयुक्तांनी अर्थसंकल्पात केली. पालिका वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार करताना नर्सिग विद्यालयांचे महाविद्यालयांत रूपांतर करणे, पदवी अभ्यासक्रमाच्या जागांत वाढ करणे, सहा उपनगरी रुग्णालयांत ‘डीएनबी’चा अभ्यासक्रम सुरू करण्याचे सूतोवाच अर्थसंकल्पातून करण्यात आले.

महापालिकेच्या सर्व नर्सिग स्कूलचे बीएससी नर्सिग कॉलेजमध्ये रूपांतर करण्यात येणार असून त्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय शीव रुग्णालयातील एमबीबीएसच्या जागांत १५० वरून २०० अशी वाढ करण्यात आली आहे. केईएममध्ये १८० वरून २५०, तर नायरमध्ये १२० वरून १५० जागा वाढविण्यात आल्या आहेत. सर्व वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालयात नवीन यंत्रसामग्री  घेण्यासाठी ९६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.

करोनाच्या पहिल्या टप्प्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या कस्तुरबा रुग्णालयात नवीन इमारत बांधणे, सर्व उपनगरीय रुग्णालयांत गुणवत्ताधारक आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, निवडक उपनगरीय रुग्णालयात अतिविशेष सेवा देणे, वैद्यकीय रुग्णालयांशी संलग्न रुग्णालयांवरील भार कमी करण्यासाठी उपनगरीय रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उपनगरीय रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध व्हावेत यासाठी सहा रुग्णालयांत डीएनबीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून यासाठी कंत्राटी तत्त्वावर १७२ वैद्यकीय अध्यापकांची पदे भरण्याचे काम सुरू झाले आहे. या सर्व रुग्णालयांना पदव्युत्तर शैक्षणिक संस्थेत रूपांतरित केले जाणार आहे. आरोग्य संस्थांच्या स्थापत्य बळकटीकरणासाठी २९ रुग्णालये, २८७ आरोग्य केंद्रे व दवाखाने तसेच २८ प्रसूतिगृहांचे काम हाती घेण्यात आले असून यासाठी २०२०-२१ मध्ये ४८३ कोटी रुपये, तर २०२१-२२ मध्ये ८२२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

रुग्णालय नियंत्रण कक्ष

आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात दाखल झालेल्या आपद्ग्रस्तांची माहिती मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्षास उपलब्ध करणे, रुग्णालयातील घडामोडीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करून निरीक्षण करणे याकरिता १३ रुग्णालयांत नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहे.

फिरते दवाखाने

गर्भवती महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक इत्यादी व्यक्तींना घरात सेवा देण्याच्या उद्देशाने पूर्व, पश्चिम उपनगरासाठी मोबाइल व्हॅन उपलब्ध केली जाणार असून यासाठी अर्थसंकल्पात ५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

सीटीस्कॅन आणि एमआरआय सुविधा

शीव येथील लो. टिळक, केईएन आणि नायर रुग्णालयात तीन अत्याधुनिक सीटीस्कॅन यंत्रे उपलब्ध केली जाणार असून यासाठी ८ ते १० कोटी रुपये खर्च केला जाईल, तर या तिन्ही रुग्णालयांसाठी एमआरआय यंत्रेही खरेदी केली जाणार असून यासाठी १७ ते २० कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.

अन्य महत्त्वाच्या घोषणा

* संसर्गजन्य आजारांसाठी २०३० पर्यंत सर्व बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट

* जन्म-मृत्यू दस्तावेजाची डिजिटल नोंदणी

करोना निधीतून ४० कोटी खर्च

२०२०-२१ या आर्थिक वर्षांसाठी पालिकेने आरोग्यासाठी ४२६० कोटी रुपयांची तरतूद केली होती. प्रत्यक्षात यापेक्षा २२ टक्क्यांहून अधिक खर्च या वर्षांत झाला आहे. मार्चपासून हाहाकार उडविलेल्या करोना साथीला आटोक्यात आणण्यासाठी पालिकेने सेव्हनहिल्स रुग्णालयासह नेस्को करोना केंद्र, प्रसूतिगृहे यात करोनबाधितांच्या उपचारासाठी वॉर्ड उपलब्ध केले. करोना रुग्णांसाठी ऑक्सिजन पुरवठय़ासह २३६१ सर्वसाधारण खाटा, ४९९ अतिदक्षता खाटा, अतिगंभीर रुग्णांसाठी (हाय डेपेनडेन्सी युनिट) १४७ खाटा आणि १९ द्रावरूप ऑक्सिजन टँक उपलब्ध केले. याकरिता करोनासाठीच्या निधीतून सुमारे ४० कोटी ३० लाख रुपये खर्च झाले.