सोमाणी मार्गाचे रुंदीकरण रद्द करण्याची पालिकेवर नामुष्की

बॉम्बे जिमखाना आणि आझाद मैदानातील जागा देण्यास राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या दप्तरदिरंगाईमुळे लाखो पादचाऱ्यांची वर्दळीतून सुटका करणारा आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न निकालात लावू शकणाऱ्या हजारीमल सोमाणी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम अखेर रद्द करण्याची नामुष्की पालिकेवर ओढवली आहे. हा प्रकल्पच बासनात गुंडाळला गेल्यामुळे दररोज १५ ते २० लाख पादचाऱ्यांना दाटीवाटीने धक्के खातच मार्गक्रमण करावे लागणार आहे.

छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकात उतरणारे लाखो प्रवासी कॅपिटल चित्रपटगृहालगत असलेल्या हजारीमल सोमाणी मार्गावरून फॅशन स्ट्रीट, चर्चगेट, नरिमन पॉइंट आणि आसपासच्या भागात जात असतात. नरिमन पॉइंट येथून छत्रपती शिवाजी टर्मिनस मार्गे भायखळ्याच्या दिशेला जाण्यासाठी लाखो वाहनचालक याच मार्गाचा वापर करतात. मुळातच अरुंद असलेला हजारीमल सोमाणी मार्ग पादचारी आणि वाहनांच्या गर्दीमुळे दिवसभर गजबजलेला असतो. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. त्यानुसार रस्ते विभागाने निम्म्या हजारीमल सोमाणी मार्गाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव तयार करून स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी सादर केला होता. स्थायी समितीने मंजुरी देताना हजारीमल सोमाणी मार्गाचा पुढील भागही रुंद करण्याची मागणी सदस्यांनी केली. स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर प्रशासनाने भव्या एन्टरप्राइझेस या कंपनीला ५.२७ कोटी रुपयांचे रस्ता रुंदीकरणाचे कंत्राट दिले. त्याचबरोबर कंत्राटदाराला कार्यादेशही देण्यात आले. या मार्गालगत आझाद मैदान असून मैदानात काही सरकारी कार्यालयांची कार्यालये उभी आहेत. या कार्यालयांसमोरील मोकळा भाग रस्ता रुंदीकरणाआड येत होता. त्यामुळे ही जागा पालिकेला हस्तांतरित करावी, अशी विनंती पालिकेकडून सरकारला करण्यात आली होती.

हजारीमल सोमाणी मार्गाच्या पुढील भागाचेही रुंदीकरण करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले. या मार्गाच्या फॅशन स्ट्रीटच्या दिशेचा बॉम्बे जिमखाना आणि आझाद मैदानाचा भाग रुंदीकरणाआड येत होता. मात्र तरीही रस्ता रुंदीकरण करण्यावर पालिका आयुक्त ठाम होते. रस्त्याच्या उर्वरित भागाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश रस्ते विभागाला देण्यात आले होते.

उर्वरित रस्त्यांच्या रुंदीकरणात येणाऱ्या भागाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश आयुक्तांनी पालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयाला दिले. सर्वेक्षणाअंती बॉम्बे जिमखान्याचा काही भाग आणि आझाद मैदानाचा परिसर रस्त्यासाठी आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाने बॉम्बे जिमखान्याला भाडेपट्टय़ाने आझाद मैदानातील जागा दिली असून या भाडेपट्टय़ाची मुदत संपुष्टात आली आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक जागा उपलब्ध होण्याचा मार्गही मोकळा झाला होता. ही जागा रस्त्याच्या कामासाठी द्यावी, अशी विनंती करणारे पत्र पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबत राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केला होता.

गेल्या सुमारे दीड-दोन वर्षांच्या कालावधीत आझाद मैदानातील सरकारी कार्यालयांसमोरील मोकळी जागा उपलब्ध करण्यास पालिका अपयशी ठरली. त्यामुळे निम्म्या हजारीमल सोमाणी मार्गाच्या रुंदीकरणाचे कामही रेंगाळले होते. तसेच बॉम्बे जिमखाना आणि आझाद मैदानाचा काही भाग रस्त्यासाठी देण्याबाबत राज्य सरकारकडूनच प्रचंड दिरंगाई झाली. त्यामुळे निम्म्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम रद्द करण्याची नामुष्की पालिकेवर ओढवली. रस्त्यालगतची जागा पालिकेच्या ताब्यात मिळू न शकल्याने भव्या एन्टरप्राइझेसला रुंदीकरणाचे कामच सुरू करता आले नाही. अखेर या कंपनीबरोबरचे कंत्राटही पालिकेला रद्द करावे लागले. इतकेच नव्हे तर हजारीमल सोमाणी मार्गाच्या फॅशन स्ट्रीटच्या दिशेच्या उर्वरित भागाच्या रुंदीकरणाचा प्रस्तावही रस्ते विभागाने सादर केलेला नाही.