तौते चक्रीवादळामुळे मुंबईत पावसासह वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार चक्रीवादळाचा प्रभाव मुंबई परिसरात कमी असला तरी जोरदार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने रविवारी कोविड १९ लसीकरण रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तौते चक्रीवादळ मुंबई जवळून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने सोमवारी देखील लसीकरण मोहिम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

चक्रीवादळानंतर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून १५ आणि १६ मे रोजी लसीरकरण न करण्याचा निर्णय घेतला होता.

खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने शहरातील कोविड केअर सेंटरमधील ५८० रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयांमध्ये हलवले आहे. पालिकेने शनिवारी रात्री बीकेसी (२४३), दहिसर (१८३) आणि मुलुंड (१५४) जंबो कोविड सेवेच्या सुविधा असलेल्या या कोविड सेंटरमधून ५८० रुग्णांना मुंबईतील इतर रुग्णालयात हलवले आहे.

सध्या अरबी समुद्रात घोंगावत असलेले चक्रीवादळ हळूहळू महाराष्ट्राच्या दिशेनं सरकत आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून हे वादळ पुढे गुजरातच्या दिशेने जाणार आहे. त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीतील यंत्रणांना सर्तक झाल्या आहेत. वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस झाल्यानं घरांसह शेतमालाचं नुकसान झालं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला तौते चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात धडक दिल्यानंतर मालवण तालुक्याच्या किनारपट्टीवर वादळाने तडाखा देण्यास सुरुवात केली. रात्रीपासून कोसळणाऱ्या  पावसाचा वेग वाढला असून झाडे मोडून पडली आहेत. अनेक ठिकाणी वीजेचे खांब कोसळले असून काही ठिकाणी पोफळीच्या झाडांचे नुकसान झालं आहे. वेगुर्ले, रत्नागिरी येथे समुद्राला उधाण आलं आहे.