कफ परेडलगत मुंबईचा विस्तार; वृक्षतोडणीनंतर पर्यावरण संतुलनासाठी महापालिकेला उपरती

मेट्रो, सागरी किनारा मार्ग यासह विविध विकासकामांमुळे मुंबईत मोठय़ा प्रमाणावर वृक्षतोड सुरू असून त्यामुळे शहराच्या पर्यावरणाचे संतुलन बिघडण्याचा धोका आहे. त्यावर मात्रा म्हणून मुंबई महानगरपालिकेने समुद्रात भराव टाकून तब्बल ३०० एकर जमीन निर्माण करण्याची योजना आखली असून, त्यावर सामाजिक वनीकरणाद्वारे ‘ग्रीन पार्क’ची उभारणी केली जाणार आहे. या योजनेसाठी कफ परेडमधील गीतानगर ते एनसीपीए परिसरालगत समुद्रामध्ये भराव टाकण्यात येईल. मेट्रो आणि सागरी किनारा मार्ग प्रकल्पात निर्माण होणाऱ्या टाकाऊ मातीचा वापर भरावासाठी करण्यात येणार असून, यासाठी आवश्यक असलेली पर्यावरण आणि किनारा नियमन क्षेत्रविषयक (सीआरझेड) परवानगी मिळविण्याच्या हालचाली पालिकेने सुरू केल्या आहेत.

मेट्रो प्रकल्पामुळे मुंबईतील तब्बल पाच हजार वृक्षांवर गंडांतर आले असून न्यायालयाच्या आदेशानंतर वृक्षतोडीला सुरुवात झाली आहे. तसेच मुंबईमधील वाहतूककोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी आणि वाहतुकीला गती देण्यासाठी नरिमन पॉइंट ते कांदिवलीदरम्यान सागरी किनारा मार्ग उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाआड येणारे काही वृक्ष तोडावे लागणार आहेत. त्यामुळे मुंबईमधील पर्यावरणाचे संतुलन बिघडण्याचा मोठा धोका आहे. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने मोठय़ा प्रमाणावर सामाजिक वनीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

समुद्रात भराव टाकण्यासाठी किनाऱ्यालगतच्या कफ परेड परिसराची निवड करण्यात आली आहे. कफ परेडमधील गीता नगर ते एनसीपीए दरम्यान समुद्रामध्ये भराव टाकून तब्बल ३०० एकर जमीन निर्माण करण्यात येणार आहे. गीतानगर आणि किनाऱ्याच्या आसपास मोठय़ा प्रमाणावर झोपडपट्टी पसरली आहे. नव्या भरावभूमीमध्ये झोपडय़ांचे अतिक्रमण होऊ नये म्हणून तेथे उंच संरक्षक भिंत उभारण्याचा विचार पालिका करीत आहे!

राज्य सरकार आणि पालिका यांच्या दृष्टीने मेट्रो आणि सागरी किनारा मार्ग हे दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमुळे मोठय़ा प्रमाणावर टाकाऊ माती (डेब्रिज) निर्माण होईल. मुंबईमध्ये दररोज निर्माण होणारा तब्बल ९ हजार मेट्रीक टन कचरा देवनार, कांजूर आणि मुलुंड येथील कचराभूमीमध्ये टाकण्यात येतो. या तिन्ही कचराभूमींची क्षमता संपुष्टात आली आहे. काही वर्षांपूर्वी नालेसफाईमधील गाळ मढ येथील कचराभूमीत टाकण्यात येत होता. परंतु तिची क्षमता संपुष्टात आल्याने आता कंत्राटदारांनाच मुंबईबाहेर नाल्यातील गाळाची विल्हेवाट लावण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. आता मेट्रो व सागरी किनारा मार्ग प्रकल्पामुळे निर्माण होणारी माती टाकायची कुठे असा प्रश्न पालिकेला भेडसावत होता. कफ परेड येथे समुद्रात भराव टाकण्यासाठी या मातीचा वापर करण्यात येणार आहे.

वृक्ष लागवडीसाठी जागाच नाही!

मुंबई शहर ६८.७१ चौरस कि.मी., पश्चिम उपनगरे २१०.५४ चौरस कि.मी., तर पूर्व उपनगरे १५८.४६ चौरस कि.मी. क्षेत्रफळावर उभी आहेत. संपूर्ण मुंबईचे क्षेत्रफळ ४३७.७१ चौरस कि.मी. इतके आहे.

मात्र मोठय़ा प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यासाठी मुंबईत मोकळी जागा शिल्लक नाही. त्यामुळे समुद्रामध्ये भराव टाकून जमीन निर्माण करण्याची योजना पालिकेच्या विचाराधीन आहे.

परिणामी भविष्यात शहर भागातील क्षेत्रफळात ३०० एकरांची भर पडेल. मुंबईच्या विकास आराखडय़ात त्याबाबत प्रस्तावितही करण्यात आले आहे.

मुंबईच्या विकास आराखडय़ातील प्रस्तावित तरतुदीनुसार कफ परेडजवळील किनाऱ्यालगत भराव टाकून भूमी निर्माण करण्यात येणार आहे. ही भरावभूमी केवळ ‘ग्रीन पार्क’ असेल. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
– अजोय मेहता, पालिका आयुक्त

याआधी.. १७८४ मध्ये भराव टाकून गिरगाव आणि वरळी बेटे जोडण्यात आली. त्यातून रेसकोर्सचा जन्म झाला. तत्पूर्वी या दोन्ही बेटांमधून थेट पायधुनीपर्यंत समुद्राचे पाणी जात होते. ते रोखले गेले. मात्र या दोन बेटांमधील भराव बेकायदा ठरविण्यात आला आणि त्यावेळचे ब्रिटिश गव्हर्नर रॉबर्ट क्लाईव्ह यांना त्यासाठी शिक्षाही झाली होती! त्यानंतर कुलाबा आणि गिरगाव बेट भराव टाकून जोडली. सन १९७०-७१च्या सुमारास समुद्रात भराव टाकून नरिमन पॉइंट उभे राहिले. त्यापाठोपाठ खाडीत भराव टाकून वांद्रे-कुर्ला संकुल, लोखंडवाला संकुल उभे राहिले.