05 July 2020

News Flash

फक्त ३५० खड्डे उरले!

नागरिकांच्या तक्रारींनंतर चार हजार खड्डे बुजवल्याचा पालिकेचा दावा

(संग्रहित छायाचित्र)

नागरिकांच्या तक्रारींनंतर चार हजार खड्डे बुजवल्याचा पालिकेचा दावा

मुंबई : मुसळधार पावसामुळे खडबडीत आणि खड्डेमय झालेल्या रस्त्यांवरून जाताना मुंबईकरांची हाडे खिळखिळी होत असली तरी, मुंबई महापालिकेला मात्र हे खड्डे दिसलेले नाहीत. उलट मुंबईकरांनी खड्डय़ांबाबत केलेल्या ४३५१ तक्रारींनंतर ४००१ ठिकाणचे खड्डे बुजवल्याचा दावा पालिकेने केला आहे. म्हणजेच पालिकेच्या लेखी मुंबईत अवघे साडेतीनशे खड्डे उरले आहेत.

पावसाळा सुरू झाल्यापासून म्हणजे १० जूनपासून १७ सप्टेंबपर्यंतच्या काळात रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांची सुमारे ४,३५१ नागरिकांनी पालिकेकडे ऑनलाइन तक्रार केली. यापैकी ४,००१ तक्रारींमध्ये नमूद केलेले खड्डे बुजविण्यात आले असून आता केवळ ३५० नागरिकांनी केलेल्या तक्रारींमधील खड्डे बुजविण्याचे काम शिल्लक असल्याचा दावा पालिका अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. त्याच वेळी रस्त्यांवर पडलेले खड्डे शोधून ते बुजविण्याची कामगिरी विभाग स्तरावरील विभाग कार्यालयांतील अभियंते, रस्ते विभागातील अभियंते आणि प्रकल्प विभागातील अभियंत्यांवर सोपविण्यात आली आहे, असे पालिकेचे म्हणणे आहे.

रस्त्यांची चाळण झाल्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. डांबरमिश्रित खडीने रस्ता समतोल केलेल्या ठिकाणी वारंवार खड्डे पडत आहेत. दक्षिण मुंबईमधून पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये जाणाऱ्या बहुतांश सर्वच रस्त्यांवर खड्डय़ांच्या अडथळ्यातून वाहनचालकांना वाट काढावी लागत आहे. आतापर्यंत वरळी येथील पालिकेच्या कारखान्यात तब्बल १,६८० टन शीत डांबरमिश्रित खडीचे उत्पादन करण्यात आले असून खड्डे बुजविण्यासाठी ते विभाग कार्यालयांना वितरित करण्यात आले आहेत. मात्र रस्त्यांवरील खड्डय़ांचे प्रमाण लक्षात घेत विभाग कार्यालयांकडून मोठय़ा प्रमाणावर डांबरमिश्रित खडीची मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे कारखान्यांत प्रतिदिन २० ते २५ टन डांबरमिश्रित खडीचे उत्पादन करण्यात येत आहे.

 

भांडुपमधून सर्वाधिक तक्रारी

पालिकेकडे खड्डय़ांच्या तक्रारी करणाऱ्यांच्या यादीत भांडुपकर आघाडीवर आहेत. भांडुपमधील ३५५ नागरिकांनी खड्डय़ांच्या तक्रारी केल्या असून त्यापैकी ३१२ तक्रारींचे निराकरण केल्याचा दावा पालिकेने केला आहे. आता भांडुपमधील खड्डय़ांच्या केवळ ४३ तक्रारीच शिल्लक असल्याचेही पालिकेचे म्हणणे आहे, तर त्याखालोखाल गोरेगाव आणि आसपासच्या परिसरांतील (पी-दक्षिण) ३३२ नागरिकांनी खड्डय़ांबाबत तक्रारी केल्या असून त्यापैकी २९३ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.  मालाड (३१३ तक्रारी), कुर्ला (२८८), अंधेरी पश्चिम (२६०) विभागातील नागरिकांनी तक्रारी करून रस्त्यांवरील खड्डे पालिकेच्या निदर्शनास आणून दिले. सर्वात कमी ६२ तक्रारी दहिसर भागातून करण्यात आल्या. त्यापैकी केवळ सहा तक्रारींचे निराकरण झालेले नाही.  पण प्रत्यक्षात येथेही रस्त्यांवर खड्डे आढळतात.

 

कुलाबा-चर्चगेट-सीएसएमटी तक्रारमुक्त

पालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील कुलाब्यापासून चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतच्या परिसरातील खड्डय़ांबाबत १४९ तक्रारी करण्यात आल्या होत्या. या सर्वच तक्रारींचे निराकरण करून खड्डे भरण्यात आले आहेत. पालिकेच्या आकडेवारीवरून हा परिसर खड्डेमुक्त असल्याचे चित्र निर्माण होते. मात्र प्रत्यक्षात पालिका मुख्यालयाच्या आसपासच्या रस्त्यांवरही खड्डे पडले असून त्याची दुरुस्ती अद्याप झालेली नाही. पालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या धोबी तलाव परिसरातील मेट्रो चित्रपटगृहाकडून मरिन लाइन्स आणि गिरगावच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवरही मोठमोठे खड्डे पडले असून दुचाकीस्वारांना अपघातांचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यांची गेल्याच वर्षी दुरुस्ती करण्यात आली आहे हे विशेष.

खड्डा आणि खडीमुळे अपघातांना आमंत्रण

रस्त्यांवरील खड्डे आणि त्यातील पसरलेली खडी अपघातांचे मुख्य कारण बनली आहेत. ही खडी हटविण्याची जबाबदारी रस्ते विभागातील संबंधित कर्मचारी, कामगारांवर सोपविण्यात आली आहे. मात्र अनेक ठिकाणी खड्डय़ालगत पसरलेली खडी हटविण्यात आलेली नाही. त्यामुळे दुचाकीस्वारांचे मोठय़ा प्रमाणावर अपघात होत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2019 3:07 am

Web Title: bmc claim only 350 pothole remain in the mumbai city zws 70
Next Stories
1 ‘बेस्ट’च्या ताफ्यात ५०० सीएनजी गाडय़ा
2 शहरात मधुमेह, हृदयविकाराच्या झटक्याने सर्वाधिक मृत्यू
3 पालिकेची रुग्ण शोध मोहीम ; घरोघरी जाऊन ४० लाख व्यक्तींची तपासणी करणार
Just Now!
X