मुंबई : कोणत्याही परिस्थितीत यंदा पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्याचा अट्टहास मुसळधार पावसामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अंगाशी आला. विधिमंडळात पाणीच पाणी होऊन वीज गेल्यामुळे कामकाज स्थगित करण्याची वेळ आली. या पाश्र्वभूमीवर मुंबईचे ‘नागपूर’ होणार नाही, याची काटेकोर काळजी घेतल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे.

पाणी तुंबू नये यासाठी जवळपास २९८ पंप बसवतानाच पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी गेल्या वर्षी पाणी तुंबण्याच्या जागा व त्यामागची कारणे शोधून ‘मायक्रो प्लॅनिंग’ केल्यामुळे कमी वेळेत जास्त पाऊस पडूनही पाण्याचा निचरा लवकरात लवकर करण्यात पालिकेला यश येत आहे. परिणामी, कोणत्याही परिस्थितीत मुंबईचे नागपूर होणार नाही, असा विश्वास पालिकेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.

यंदा बदलत्या हवामानाच्या पाश्र्वभूमीवर कमी वेळेत जास्त पाऊस पडण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे जागोजागी साठणाऱ्या पाण्याचा तात्काळ निचरा होण्यासाठी एकूण २२५ सखल भाग शोधून काढण्यात आले. त्यापैकी १२५ ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून येत्या महिन्यात उर्वरित सर्व ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था सक्षम करण्यात येणार असल्याचे आयुक्त अजोय मेहता यांनी सांगितले. विभाग पातळीवरील कामाचे व मुख्यालयाचे समन्वय करण्यात आले असून पावसाच्या काळात जवळपास अडीच हजार पालिका कर्मचारी रस्त्यावर उतरून काम करीत असतात. या कामावर थेट देखरेख ठेवण्याचे काम अतिरिक्त आयुक्तांवर सोपविण्यात आले असून मुंबई शहर, पश्चिम उपनगर व पूर्व उपनगरात आमचे अतिरिक्त आयुक्त ठिय्या देऊन कामाची देखरेख करतात, असे आयुक्त मेहता यांनी सांगितले. मुंबईतील छोटय़ा-मोठय़ा मिळून २४९.५१ किलोमीटर लांबीच्या नाल्यांमधून पावसाळ्यापूर्वी सुमारे २,१६,३३५ मेट्रिक टन गाळ काढण्यात आला असून नालेसफाईचे काम ९१ टक्क्यांहून जास्त करण्यात आले आहे. यंदा थर्मोव्हिजन कॅमेऱ्यांचा वापर करून पाइपलाइनमध्ये कचरा कोठे अडला आहे का याचा शोध घेऊन सफाई करण्यात आली.

अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा वेगाने होण्यासाठी मोठय़ा मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यात आल्या असून वाहतुकीची अडचण लक्षात घेऊनही हिंदमाता परिसरात मोठय़ा पर्जन्य जलवाहिन्या टाकण्याचे काम ४० टक्के पूर्ण करण्यात आले आहे.

यंदाही रेल्वेला चार कोटी रुपये देण्यात आले आहेत. रेल्वे व मेट्रोच्या अधिकाऱ्यांबरोबर सातत्याने समन्वय ठेवून काम करण्यात येत असल्यामुळे भरतीच्या वेळी अतिमुसळधार पाऊस झाला नाही तर मुंबईकरांना पाणी तुंबण्याचा फारसा त्रास सहन करावा लागणार नाही, असे आयुक्त मेहता म्हणाले.

उद्धव ठाकरेंचे जातीने लक्ष

महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्याच आठवडय़ात पालिकेच्या नियंत्रण कक्षला भेट देऊन मुंबई महापालिकेने केलेल्या कामाचा आढावा घेतला. पावसाळापूर्व नालेसफाईचीही उद्धव ठाकरे यांच्यासह महापौर व अन्य नेत्यांनी पाहाणी केली होती. ऐन पावसाळ्यात उद्धव ठाकरे दररोज पालिकेच्या कामाचा आढावा घेत असल्याचे पालिकेच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मेट्रोच्या कार्यस्थळी पाणी साचले नाही ; एमएमआरसीचा दावा

मुंबई : दक्षिण मुंबईत ‘मुंबई मेट्रो-३’ प्रकल्पाचे काम सुरू असलेल्या कोणत्याही ठिकाणी रविवारी पावसाचे पाणी साचले नव्हते. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सांडपाणी वाहिन्यांच्या जोडणीतील त्रुटींमुळे काही प्रश्न निर्माण झाले होते. ‘मुंबई मेट्रो-३’चे काम करणारे पथक आणि कंत्राटदारांकडून पालिकेला सर्वतोपरीने मदत करीत आहे. पालिकेच्या विनंतीनुसार अधिक संख्येने पाण्याचा उपसा करणारे पंप तेथे बसविण्यात आले आहेत, असा खुलासा मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाकडून (एमएमआरसी) करण्यात आला आहे.

दै. ‘लोकसत्ता’च्या ८ जुलै २०१८ रोजी प्रसिद्ध झालेल्या अंकामध्ये ‘मेट्रो स्थानकांच्या कामामुळे रस्ते जलमय’ या मथळ्याखाली कफ परेड, विधान भवन, चर्चगेट आणि हुतात्मा चौक येथे सुरू असलेल्या मेट्रो-३च्या स्थानकाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी पाणी साचल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. दक्षिण मुंबईमध्ये ‘मुंबई मेट्रो-३’ प्रकल्पाची कामे सुरू असून कामे सुरू असलेल्या ठिकाणी रविवारी पाणी साचल्याचे निदर्शनास आलेले नाही. मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाने प्रकल्पाची कामे सुरू असलेल्या ठिकाणी पावसाचे पाणी साचू नये यादृष्टीने पावसाळ्यापूर्वी आवश्यक त्या बाबींची पूर्तता केली आहे, असे मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.