‘लोकसत्ता’मधील बातमीनंतर प्रशासनाची कारवाई

मुंबई : दादरमधील पालिका मंडईच्या बाहेर साठलेले तांदळाच्या भुशाचे ढीग अखेर पालिकेच्या घनकचरा विभागाने हटवले आहेत. मंडईच्या बाहेर गेल्या अनेक दिवसांपासून साचलेल्या या कोंडय़ामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिले होते. त्याची दखल घेत ही कार्यवाही करण्यात आली.

दादर पश्चिमेला फूल बाजारातून बाहेर आल्यावर तुळशी पाइप मार्गावरून लोअर परळच्या दिशेने जाताना डाव्या बाजूला पालिकेच्या मंडईच्या बाहेर तांदळाच्या कोंडय़ांचे ढीग जमा होतात.  हैदराबाद, कर्नाटक येथून रोज गोडय़ा पाण्यातील मासे या मंडईत आणले जातात. मासे साठवण्यासाठी बर्फ आणि तांदळाच्या टरफलांचा भुसा वापरला जातो. मासे मंडईत उतरवल्यानंतर हा भुसा रस्त्यावरच टाकला जात असल्यामुळे पादचाऱ्यांना त्याचा त्रास सोसावा लागतो. लोअर परळच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर सुमारे २५ ते ३० मीटपर्यंतच्या भागात तांदळाच्या भुशाची रास पडलेली असते. याबाबत ‘लोकसत्ता मुंबई’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर पालिकेच्या घनकचरा विभागाने येथे साफसफाई केली.