झोपु योजनेसाठी पालिकेकडून मार्ग मोकळा

निशांत सरवणकर, मुंबई</strong>

कोळीवाडे आणि गावठाणे यांचे मुंबईशी वेगळे नाते असले तरी यापैकी एक असलेला शीव कोळीवाडा आता पूर्णपणे नष्ट होणार आहे. शीव कोळीवाडय़ातील उरलीसुरली सर्व बांधकामे तोडून पालिकेकडून मोकळा भूखंड झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी विकासकाला सुपूर्द केला जाणार आहे. वरळी कोळीवाडा झोपडपट्टी करण्याच्या प्रयत्नास तूर्तास खीळ बसली असली तरी शीव कोळीवाडय़ाला मात्र ते भाग्य लाभलेले नाही.

शीव कोळीवाडय़ातील ५६ बांधकामे पाडण्यास पालिकेच्या एफ-उत्तर विभागाने सोमवारी सुरुवात केली. प्रचंड पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. कोळीवाडे व गावठाणे यांचे सीमांकन केल्याशिवाय कुठलीही कारवाई करू नये, असे आदेश उच्च न्यायालयाने शनिवारी अ‍ॅड. गॉडफ्रे पिमेंटा यांच्या याचिकेवर दिलेले असतानाही ते शीव कोळीवाडय़ाला लागू होत नाही, असा दावा पालिकेने केला आहे आणि आपल्या कारवाईचे समर्थन केले आहे.

शीव कोळीवाडयाच्या मूळ मिळकत पत्रकानुसार ही जागा कोळी जमातीची असून ती तब्बल नऊ  एकर आहे. यावर कामगार गृहनिर्माण संस्था तसेच आगरवाडा गृहनिर्माण संस्था तसेच १९१ भूखंडधारक आणि १९ जुनी घरे होती. आता फक्त ही जुनी घरे जमीनदोस्त होण्याची वाट पाहिली जात आहे. ही घरे हजार चौरस फुटापेक्षा अधिक असताना हा परिसर झोपडपट्टी कसा ठरू शकत असतो, असा सवाल येथील मूळ रहिवासी राजेश केणी यांनी केला आहे. महापालिकेने हा भूखंड आपला असल्याचे दाखवून विकासकाच्या दबावाखाली परिशिष्ट दोन जारी केले. ते बेकायदा आहे. मुळात हा भूखंड पालिकेचा नाही. तो खासगी असल्याची कागदपत्रे आपण पाठपुरावा करून मिळविली आहेत. त्यामुळे यावर झोपु योजना लादली जाऊ  शकत नाही, असा आरोपही केणी यांनी केला आहे. भूनोंदणी कायदा १९२५ नुसार मुंबईतील कोळीवाडे ही खासगी भूधारकांची मालमत्ता आहे. असे असतानाही पालिकेच्या मालमत्ता विभागाने बळजबरीने झोपु योजना कोळीवाडय़ावर लादली आहे, असा त्यांचा आरोप आहे.

शीव कोळीवाडयाचा भूखंड हा पालिकेच्या मालकीचा असल्यामुळे त्या भूखंडावर झोपडपट्टी घोषित करण्याची आवश्यकता नसते. १९७२, १९९५ वा २०००च्या सर्वेक्षणानुसार फोटोपास जारी झालेला असला तरी झोपु योजनेला परवानगी देता येते. १९९८-९९ मध्ये ही योजना दाखल झाली आहे. आकार झोपु योजनेला विकास नियंत्रण नियमावली ३३(१०) मध्ये तर शीव कोळीवाडा झोपु योजनेला ३३(७) अंतर्गत परवानगी देण्यात आली आहे, असे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांनी स्पष्ट केले आहे, तर शीव कोळीवाडा हा परिसर झोपडपट्टी घोषित झालेला आहे. त्यानुसार आयओडी, सीसी तसेच आवश्यक त्या सर्व परवानग्या झोपु प्राधिकरणाने दिलेल्या आहेत, असे ‘सुहाना बिल्डर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुधाकर शेट्टी यांचे म्हणणे आहे.