फेरीवाल्यांना पाठीशी घालत असल्याने आयुक्तांचा निर्णय

मुंबईमधील परवानाधारक फेरीवाले अटी आणि शर्तीचे पालन करतात की नाही यावर करडी नजर ठेवण्यासाठी नियुक्त केलेल्या दक्षता विभागाच्या पथकाकडून अधिकाराचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अखेर सोमवारी हे पथक बंद करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. दक्षता पथकातील या निरीक्षकांना आता नियमित कामामध्ये सामावून घेण्यात येणार आहे.

मुंबईमध्ये काही फेरीवाल्यांना फार पूर्वीच परवाने दिले आहेत. या परवानाधारक फेरीवाल्यांच्या आडून अनेक अनधिकृत फेरीवाल्यांनी आपले ठेले लावले आहेत. काही फेरीवाल्यांना पान-विडी विकण्याचा परवाना दिला आहे. परंतु या फेरीवाल्यांनी पान-विडीऐवजी वडापाव, पावभाजी, चायनिज आदी विविध खाद्यापदार्थ विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यासाठी पालिकेची पूर्वपरवानगीही घेण्यात आलेली नाही. पालिकेने परवानाधारक फेरीवाल्यांना पदपथावर जागा आखून दिली आहे. परंतु दिलेल्या जागेव्यतिरिक्त पदपथावरील अतिरिक्त जागेचा वापर हे फेरीवाले करीत आहेत. अशा परवानाधारक फेरीवाल्यांना वेसण घालण्यासाठी पालिकेने दक्षता विभागातील निरीक्षकांचा समावेश असलेले पथक स्थापन केले होते. शहर, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगर यासाठी तीन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात पालिकेच्या अटी आणि शर्तीचे उल्लंघन करणाऱ्या परवानाधारक फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पथकातील निरीक्षकांना महापालिका अधिनियम १८८८ मधील कलम ३९४ अन्वये विशेष अधिकार देण्यात आले होते. त्यानुसार या निरीक्षकांना वेळप्रसंगी फेरीवाल्यांविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्याचे अधिकारही होते.

नरिमन पॉइंट परिसरातील जमनालाल बजाज मार्गावरील फेरीवाल्यांनी अटी आणि शर्तीचा भंग केल्याचे पालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयाच्या निदर्शनास आले होते. परवान्यानुसार ते व्यवसाय करीत नसल्याचेही आढळून आले होते. मात्र दक्षता विभागाच्या निरीक्षकांनी स्थळ पाहणी अहवालात या बाबी नमूद केल्या नव्हत्या. त्यामुळे दक्षता विभाग आणि अनुज्ञापन विभागातील तीन निरीक्षकांना निलंबित करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले होते. मात्र दक्षता विभागाच्या या पथकातील निरीक्षकांकडून अधिकाराचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या अजोय मेहता यांनी हे पथक तात्काळ बंद करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

फेरीवाल्यांवर वचक ठेवण्यासाठी असे पथक स्थापन करण्याबाबत सुरुवातीपासूनच दोन मतप्रवाह पालिकेत होते. असे पथक स्थापन केल्यास अधिकाराचा गैरवापर होईल अशी भीती काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे पालिकेच्या विभाग कार्यालयामार्फत ही कारवाई करावी, असे या अधिकाऱ्यांचे मत होते. अखेर आयुक्तांनी सोमवारी हे पथक बंद करण्याचे आदेश दिले. आता या पथकातील निरीक्षकांना दक्षता विभागातील नियमित कामामध्ये सामावून घेण्यात येणार आहे.