राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मुंबापुरीचा सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सौंदर्याचा ठेवा जपण्यासाठी; सार्वजनिक ठिकाणी कलात्मक निर्मिती आणि कला सादरीकरणाबाबत शिफारस करण्यासाठी ‘मुंबई कला, संगीत आणि संस्कृती आयोगा’ची स्थापना करण्याचा निर्णय घेतला असून पुढील आठवडय़ात आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या नेमणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. आयोगाच्या सदस्यपदी शिल्पकला, चित्रकला, वास्तुशास्त्र, संगीत, मराठी रंगभूमी आणि इतिहास या क्षेत्रांतील तज्ज्ञ मंडळींचा समावेश करण्यात येणार आहे.

मुंबईच्या २०१४-३४ या काळातील विकास आराखडय़ाच्या मसुद्यामध्ये मुंबईकरांची गरज लक्षात घेऊन विविध ठिकाणी कला, संगीत आणि संस्कृती यांच्या आरक्षणांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये वस्तुसंग्रहालय, कलादालने, सांस्कृतिक केंद्रे, नाटय़गृहे आदींचा समावेश आहे. ‘विकास नियंत्रण नियमावली २०३४’मध्ये कला, संगीत आणि सांस्कृतिक संवर्धनासाठी बगिचे, उद्याने, चौपीटी आदी ठिकाणांचा सकारात्मक वापर करण्यास अनुमती देण्यात आली आहे. त्यामुळे कलात्मक निर्मिती आणि सादरीकरणाची छाननी व सल्ल्यासाठी आयोगाची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत ६ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा करण्यात आली होती. मुंबईची संस्कृती, शैक्षणिक, सौंदर्याचा ठेवा जपण्यासाठी, तसेच कलात्मक निर्मिती, सादरीकरणाची छाननी, आणि सल्ल्यासाठी ‘मुंबई कला, संगीत आणि संस्कृती आयोगा’ची स्थापना करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. त्यानुसार या आयोगाच्या स्थापनेची प्रक्रिया अजोय मेहता यांनी सुरू केली आहे. पुढील आठवडय़ामध्ये आयोगाचे अध्यक्ष आणि सहा सदस्यांची नावे जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे.

या आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांचा सेवा कालावधी तीन वर्षांचा असेल. पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी आयोगावर सदस्यांची पुनर्नियुक्ती होईपर्यंत जुने सदस्य कार्यरत राहू शकतील. तसेच आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांना मानधन देण्यात येणार आहे. आयोगाचे दैनंदिन कामकाज आयुक्तांनी नियुक्त केलेल्या संचालकांमार्फत करण्यात येणार आहे. शिल्पकामे, चित्रकला, भित्तिचित्रे, पुतळे, नक्षीकाम, स्मारके, कारंजी, कमानी, नक्षीदार प्रवेशद्वार आणि सुशोभीकरण अथवा स्मारकांसाठी कायमस्वरूपी संरचना आदींबाबत सल्ला देण्याचे काम आयोगाशी निगडित राहणार आहे. कला आणि नागरी संकल्पचित्रांच्या कामासाठी सल्ला देणे, सार्वजनिक ठिकाणी केलेल्या कामांची व त्यांच्या देखभालीच्या परवानगी प्रक्रियेत आयुक्तांच्या परवानगीने मार्गदर्शक तत्त्वे बनविणे; कलाकृतीच्या कामाची संकल्पचित्रे, अंमलबजावणी, कलाकृतीच्या ठिकाणाचा आढावा, निवड व संमती देणे; पालिकेच्या मालकीचा रस्ता, चौक, बगिचा आदी ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावाची छाननी, मंजुरी, नामंजुरी आदींबाबत सुधारणा करणे; शहरातील कलाकृतीमध्ये फेरबदल करणे वा ती हटविणे; वस्तुसंग्रहालये, कलादालन आणि अन्य कला सुविधा आदींबाबत पालिका आयुक्तांना सल्ला देण्याचे काम या आयोगावर सोपविण्यात येणार आहे.

त्याचबरोबर पालिका आयुक्तांच्या विनंतीनुसार पालिका इमारत, पूल, वहिवाट, कुंपण भिंत, रस्त्यावरील फर्निचर, खासगी मालकीची कमान, पूल, संरचना वा वहिवाट आणि कुठलाही मार्ग, बगिचा अथवा सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या संरचना आणि संकल्पचित्रांबाबत अभ्यास, विचार आणि अहवाल सादर करण्याची जबाबदारी आयोगावर सोपविण्यात येणार आहे.

सार्वजनिक ठिकाणी कलाकृती कशा प्रदर्शित कराव्या, त्यांचे सादरीकरण कसे असावे याबाबत सल्ला देण्यासाठी या आयोगाची स्थापना करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईच्या सुशोभीकरणात भर पडू शकेल.

– अजोय मेहता, पालिका आयुक्त