News Flash

मुंबईत करोनाची दुसरी लाट? महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी केलं स्पष्ट; म्हणाले…

जीम आणि रेस्तराँ सुरु करण्यासाठी परवानगी देण्याचा विचार, महापालिका आयुक्तांची माहिती

मुंबईत करोनाची दुसरी लाट आली नसल्याचं महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी स्पष्ट केलं आहे. टेस्टिंगचं प्रमाण वाढवलं असल्यानेच रुग्णसंख्या वाढत असल्याचं ते म्हणाले आहेत. तसंच महापालिकेने जीम आणि रेस्तराँ मालकांशी चर्चा केली असून काही अटींसह त्यांनी परवानगी देण्याचा विचार सुरु असल्याची माहिती इक्बाल चहल यांनी दिली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, सीआयआयकडून आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

गुरुवारी मुंबईत २१६३ नव्या करोना रुग्णांची तर ५४ मृत्यूंची नोंद झाली. इक्बल चहल यांनी कार्यक्रमात बोलताना शहरात करोनाची दुसरी लाट अजिबात आलेली नाही हे पुन्हा एकदा सांगायचं असल्याचं म्हटलं. मुंबईत आधीच्या सात हजारांच्या तुलनेत सध्या दिवसाला १५ हजार चाचण्या होत असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

“महापालिकेने जाणीवपूर्वक टेस्टिंग दुपटीने वाढवण्याचा निर्णय घेतला होता. आपली आरोग्य यंत्रणा नव्या रुग्णांची काळजी घेऊ शकते याची खात्री होती. याआधी दिवसाला सात हजार चाचण्यांमागे ११०० करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत होते. पण आता टेस्टिंगची संख्या वाढवण्यात आली असल्याने ही संख्या २००० इतकी झाली आहे,” अशी माहिती इक्बाल चहल यांनी दिली.

“महापालिका दिवसाला २० हजार चाचण्या करण्याची योजना आखत आहे. चाचण्यांची संख्या दिवसाला ३२ हजार इतकी केली तर यामुळे एका दिवसाची रुग्णसंख्या चार हजारांपर्यंत जाईल. पण आपली आरोग्य यंत्रणा त्यासाठी सक्षम आहे,” असा विश्वास इक्बाल चहल यांनी व्यक्त केला.

इक्बाल चहल यांनी यावेळी क्रिकेटचं उदाहरण दिलं. “फलंदाज किती चेंडूंचा सामना करतो हे महत्त्वाचं नसून त्याने विकेट न गमावणे महत्त्वाचं आहे. करोनाचा मृत्यूदर कमी होण्याची गरज आहे. सध्या मृत्यूदर ४.५ टक्के इतका असून तो २.२ वर आणण्याचा प्रयत्न आहे,” असं ते म्हणाले. लोक अद्यापही मास्क न वापरता वावरत असल्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.

“आम्ही जीम आणि रेस्तराँ मालकांशी चर्चा करत असून मर्यादित लोकांसोबत सुरु करता येईल का याबद्दल विचार करत आहोत. आम्ही धीम्या गतीने पुढे जात आहोत. त्यानंतर कदाचित धार्मिकस्थळांचा विचार करु,” असं त्यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2020 11:31 am

Web Title: bmc commissioner iqbal singh chahal on coronavirus second wave in mumbai sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 अभिनेत्री रकुल प्रीत सिंह चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल
2 ड्रग्ज प्रकरण : एनसीबीच्या मुंबईत तीन ठिकाणी धाडी
3 रकुल प्रीत सिंहची आज ‘एनसीबी’कडून होणार चौकशी
Just Now!
X