मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रं स्वीकारताच आयुक्त इकबाल चहल हे धारावीत दाखल झाले. इथल्या परिस्थितीचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. करोना बाधितांच्या नजिकच्या संपर्कात येणाऱ्या अधिकाधिक व्यक्तींना शोधून त्यांचे संस्थात्मक अलगीकरण करावे अशा सूचना चहल यांनी केली. धारावी सारख्या विभागात इमारती आणि झोपड्यांमध्ये आढळणाऱ्या रुग्ण संख्येचं वर्गीकरण करावं अशीही सूचना चहल यांनी दिली.

कालपासून आतापर्यंत नव्या आयुक्तांनी काय काय केलं

महानगरपालिका आयुक्‍त पदाची सुत्रं काल सायंकाळी स्‍वीकारल्‍यानंतर आयुक्‍त इकबाल सिंग चहल यांनी मुंबई सेंट्रल स्थित नायर रुग्‍णालय आणि धारावी परिसर या दोन्‍ही ठिकाणी आज भेटी देऊन करोना संसर्ग प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांची माहिती जाणून घेतली.

स्‍वसंरक्षण वेश परिधान करुन थेट अतिदक्षता कक्षात रुग्‍णांची विचारपूस करतानाच कोणतीही अडचण असल्‍यास प्रशासनाशी संपर्क करा, असा सल्‍ला रुग्‍ण, डॉक्‍टर्स, निम्‍न-वैद्यकीय कर्मचारी यांच्‍यासह प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱयांनाही देऊन आयुक्‍तांनी साऱ्यांचे मनोबल वाढवले.