News Flash

रेमडेसिवीरसाठी देशात आक्रोश, पण मुंबईसाठी पालिका आयुक्तांनी मिळवले दोन लाख रेमडेसिवीर!

संदीप आचार्य महाराष्ट्रासह देशभरात रुग्णांचा रेमडेसिवीर मिळण्यासाठी आक्रोश सुरु असताना मुंबई महापालिका आयुक्तांनी मुंबईसाठी तब्बल दोन लाख रेमडेसिवीर मिळवले आहेत. जास्त दाराने ही खरेदी झाल्याचा

संदीप आचार्य

महाराष्ट्रासह देशभरात रुग्णांचा रेमडेसिवीर मिळण्यासाठी आक्रोश सुरु असताना मुंबई महापालिका आयुक्तांनी मुंबईसाठी तब्बल दोन लाख रेमडेसिवीर मिळवले आहेत. जास्त दाराने ही खरेदी झाल्याचा वाद निरर्थक असून अन्न व औषध प्रशासनाने रेमडेसिवीरच्या किमतीचे कुठेही निर्धारण केले नसून या क्षणी रुग्णांचा जीव वाचवणे यालाच माझे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी सांगितले.

महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आदी शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातही रेमडेसिवीर मिळावे यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ सुरु आहे. वाढते करोना रुग्ण आणि रेमडेसिवीरचा पुरवठा याचे प्रमाण रोजच्या रोज व्यस्त बनत चालले आहे. एफडीएचे आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या म्हणण्यानुसार रेमडेसिवीर बनविणाऱ्या एकूण सात कंपन्या असून मधल्या काळात करोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर संबंधित कंपन्यांनी रेमडेसिवीरचे उत्पादन करणे बंद केले होते. गेल्या दोन महिन्यात करोनाचे रुग्ण वेगाने वाढू लागल्यानंतर रेमडेसिवीरची मागणी परत वाढली असून संबंधित कंपन्यांनी उत्पादन वाढवायला सुरुवात केली असली तरी वाढीव पुरवठा २५ एप्रिलनंतर उपलब्ध होईल.

आजघडीला रोज ५० हजार रेमडेसिवीरचा पुरवठा होत असून प्रत्येक जिल्ह्यातील अॅक्टिव्ह करोना रुग्णांच्या संख्येनुसार रेमडेसिवीरचे वाटप केले जाते असे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी सांगितले. दरम्यान, केंद्र सरकारनेही रेमडेसिवीरच्या निर्यातीला बंदी लागू केली असून देशातील वेगवेगळी राज्ये निविदा काढून मिळेल त्या किंमतीला रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्रातही हाफकीन महामंडळाने रेमडेसिवीर खरेदीसाठी निविदा जाहीर केली असून निविदेत कॅडिला कंपनीला ५७,१०० वायल पुरवठ्याची निविदा मिळाली. ६६५ रुपये ८४ पैसे प्रतीवायल दराने हे रेमडेसिवीर मिळणार असून अद्यापि याचा पुरवठा संबंधित कंपनीकडून करण्यात आलेला नाही. दरम्यान, गुजरात मेडिकल सर्विसेस तसेच मध्यप्रदेश व अन्य काही राज्यांनी आता १५०० रुपये प्रतिवायल दराने रेमडेसिवीर खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.

रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबणार; ठाकरे सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात आजघडीला १७ हजाराहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण असून या रुग्णांना तसेच आगामी काळातील रुग्णवाढ लक्षात घेऊन महापालिका आयुक्तांनी स्वतंत्रपणे तात्काळ निविदा मागविण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी जेव्हा निविदा काढल्या होत्या तेव्हा कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही हे लक्षात घेऊन आयुक्त चहल यांनी थेट रेमडेसिवीर उत्पादक कंपन्यांशी संवाद साधून निविदा भरण्याबाबत विचारणा केली. त्यानंतर महापालिकेने काढलेल्या निविदेत मायलन या एकाच कंपनीने निविदा भरली. त्यानंतर एकच पुरवठादार असल्याने काही दिवस थांबून मायलनला पुरवठ्याचे काम देण्याचा निर्णय घेण्यात आला. मायलन कंपनीने रेमडेसिवीरच्या प्रतिवायलसाठी १५६८ रुपये दर दिला असून दोन लाख वायलचा पुरवठा ही कंपनी करणार आहे. यापैकी २० हजार वायलचा पुरवठा कंपनीने केला असून हाफकिनला मिळालेल्या ६६५ रुपये दरापेक्षा दुप्पट किंमतीला मुंबई महापालिका रेमडेसिवीर कशी खरेदी करते? असा प्रश्न यातून उपस्थित होत आहे.

याबाबत पालिका आयुक्त चहल यांना विचारले असता रुग्णांचा जीव वाचवणे याला आयुक्त म्हणून माझे सर्वोच्च प्राधान्य आहे. दिल्ली, सुरत तसेच देशातील अनेक राज्यात आज रेमडेसिवीर मिळत नाही म्हणून रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरु आहे. मुंबई महापालिकेने ज्या दराने रेमडेसिवीर घेतले त्याच दराने काही राज्ये आज रेमडेसिवीर घेत आहेत. आरोग्य विभागाअंतर्गत काही जिल्हा रुग्णालयांनी महापालिकेच्या दराने रेमडेसिवीर खरेदीचा निर्णय घेतला आहे. हाफकिनने काढलेल्या निविदेत ६६५ रुपये प्रतिवायल दर आला असला तरी आजपर्यंत निविदा मिळालेल्या कंपनीने रेमडेसिवीरचा पुरवठा केलेला नाही. ५७ हजार रेमडेसिवीरचा पुरवठा त्यांनी करणे अपेक्षित आहे.

हाफकिनने निविदा काढल्यानंतर महापालिकेने निविदा काढली असून दोन लाख रेमडेसिवीरचा पुरवठा महापालिकेला होणार असून त्यातील २० हजार रेमडेसिवीर आम्हाला मिळाल्या असल्याचे आयुक्त चहल यांनी सांगितले. अन्न व औषध प्रशासन आयुक्तांनी रेमडेसिवीरचे दर किती असावे यावर काही निर्बंध घातले आहेत का, याची आम्ही विचारणा केली असता दर निर्बंध लागू केलेले नाहीत असे एफडीएने स्पष्ट केले आहे. मुंबईतील वाढते रुग्ण व त्यांचा जीव वाचवण्यासाठी रेमडेसिवीर उपलब्ध करून देणे यालाच आमचे सर्वोच्च प्राधान्य असल्याने निविदेत आलेल्या दरानुसार आम्ही दोन लाख रेमडेसिवीर खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याचे आयुक्त चहल म्हणाले.

पालिकेकडून जादा दराने रेमडेसिवीरची खरेदी भाजपा नगरसेवकांचा आरोप

आज पुण्यात रेमडेसिवीर मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत असल्याने पुणे आयुक्तांनी मुंबई महापालिकेकडे २० हजार रेमडेसिवीर उधार म्हणून देण्याची मागणी केली आहे. अनेकदा प्रतिस्पर्धी कंपनीला कार्यादेश मिळू नये यासाठी पुरवठादार कमी दराने निविदा भरतात आणि नंतर काही कारण देऊन पुरवठा करत नाहीत. हाफकिनने काढलेल्या निविदेत ६६५ रुपये प्रतिवायल रेमडेसिवीर पुरवठ्याचा दर आला असला तरी अद्यापि संबंधित कंपनीने रेमडेसिवीरचा पुरवठा केला नसल्याचे हाफकीन महांडळाच्या सूत्रांनी सांगितले. या पाश्वभूमीवर आयुक्त चहल यांनी दराची पर्वा न करता करोना रुग्णांचा जीव वाचण्याला प्राधान्य दिली असून दिवसाच्या उजेडात आयुक्तांवर टीका करणारे नेते रात्री आयुक्तांनाच फोन करून आपल्या ओळखीच्या रुग्णांसाठी रेमडेसिवीर मागतात असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

भाजपाच्या एका नेत्याने गुजरातमधून ५० हजार रेमडेसिवीर आणून वाटण्याचे जाहीर केले होते. हा नेता कधी रेमडेसिवीर आणून वाटतो याची आम्हीही उत्सुकतेने वाट पाहात आहोत असेही हा अधिकारी म्हणाला. मुंबईतील वाढते करोना रुग्ण लक्षात घेऊन जम्बो रुग्णालये, बेड वाढवणे, ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड पासून औषधांपर्यंतची व्यवस्था युद्धपातळीवर करताना आयुक्तांनी घेतलेले धाडसी निर्णय व तत्काळ निर्णयांचे कौतुक होण्याऐवजी जर टीकेसाठी टीका होणार असेल तर आगामी काळात कोणताही अधिकारी तत्परतेने धाडसी निर्णय कशाला घेईल? असा सवालही या अधिकाऱ्याने केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 10:45 pm

Web Title: bmc commissioner iqbalsingh chahal got 2 lakh remdesivir for mumbai pmw 88
Next Stories
1 अंबानी धमकी प्रकरणात नवा ट्विस्ट, सचिन वाझे दोन हत्या करण्याची होती शक्यता; ऐनवेळी फसला प्लॅन
2 “फडणवीसांचं जर दिल्लीत वजन असेल तर….”, नाना पटोलेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर!
3 अनिल देशमुख सीबीआय चौकशीसाठी दाखल
Just Now!
X