पालिका आयुक्तांच्या आदेशाला हरताळ; कचरा न उचलणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करणार

मुंबईचे सौंदर्य जपण्याबरोबरच पादचाऱ्यांना पदपथावर आणि वाहनांना रस्त्यावर कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून नागरी कामे पूर्ण झाल्यानंतर उर्वरित बांधकाम साहित्य, मातीची (डेब्रिज), कामांसाठी वापरलेल्या यंत्रसामुग्रीची तात्काळ विल्हेवाट लावून रस्ता मोकळा करण्याच्या पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या आदेशांना हरताळ फासण्यात येत आहे. नागरी कामे उरकून कंत्राटदारांनी पोबारा केल्याने मुंबईत अनेक ठिकाणी पेव्हरब्लॉक, लाद्यांचे तुकडे, खडी, माती अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून येत आहे. पालिका अधिकारीही त्याकडे ढुंकून पाहायला तयार नाहीत. पादचाऱ्यांना, आसपासच्या रहिवाशांना आणि वाहतुकीला होणाऱ्या मनस्तापाची गंभीरपणे दखल घेत पालिका आयुक्तांनी अशा निष्काळजी कंत्राटदारांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईमध्ये सध्या मोठय़ा प्रमाणावर नागरी कामे सुरू आहेत. पालिकेने अनेक रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे पालिकेने हाती घेतली आहेत. रस्त्यावरील गटारे, पर्जन्य जलवाहिन्या, मलनिस्सारण वाहिन्या आदींची डागडुजी, नाल्यांची दुरुस्ती-सफाई आदी कामे मोठय़ा प्रमाणावर सुरू आहेत. ही कामे करताना निर्माण होणारी टाकाऊ माती; पदपथावरून उखडलेले पेव्हरब्लॉक; पदपथाचे काम पूर्ण झाल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या सिमेंट काँक्रिटच्या लाद्या, पेव्हरब्लॉक; नाल्याच्या दुरुस्तीनंतर निर्माण होणारी माती, गाळ आदी टाकाऊ साहित्य रस्त्याच्या कडेलाच फेकून दिले जाते. मुंबईत अनेक ठिकाणी इमारतींची दुरुस्ती सुरू आहे. तसेच पुनर्विकासामध्ये इमारतींचे बांधकाम सुरू आहे. अशा ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर टाकाऊ माती निर्माण होते. तसेच नागरी कामे सुरू असताना त्या भोवती बॅरिकेड उभी केली जातात. ही सर्व कामे कंत्राटदारांमार्फत करण्यात येतात.

नागरी कामे सुरू असताना त्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पालिकेच्या विभाग कार्यालयांमधील अधिकाऱ्यांवर असते. परंतु हे अधिकारीही या काचऱ्याकडे काणाडोळा करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळेच हा कचरा पदपथ अथवा रस्त्यालगत साचू लागला आहे. त्याचा त्रास पादचारी, आसपास राहणारे रहिवासी आणि वाहतुकीला होत आहे. असा कचरा रस्त्यावरून तात्काळ उचलण्याची सक्त ताकीद अजोय मेहता यांनी पालिका अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत वेळोवेळी दिली आहे.घरात अथवा इमारतीमध्ये दुरुस्तीची छोटी-मोठी कामे केल्यानंतर निर्माण होणारी टाकाऊ माती दूरवर नेऊन पदपथ अथवा रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात येते. मात्र या मातीची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेनेच पुढाकार घेतला आणि ‘कॉल ऑन डेब्रिज’ ही योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत बांधकामात निर्माण झालेली माती उचलण्यासाठी शुल्क आकारणी करण्यात येते. अधिकृतपणे मातीची विल्हेवाट लागत असल्याने या योजनेला नागरिकांकडून प्रतिसाद मिळू लागला आहे. पदपथावर टाकलेल्या कचऱ्याचा त्रास वाढू लागताच त्याबाबत नागरिक ‘कॉल ऑन डेब्रिज’ योजनेअंतर्गत हा कचरा उचलून नेण्यासाठी पालिकेकडे तक्रार करू लागले आहेत.

पैसे वाचवण्यासाठी कंत्राटदारांची शक्कल

मुंबईमधील देवनार, कांजूर आणि मुलुंड कचराभूमींची क्षमता संपुष्टात आल्यामुळे नागरी कामांमध्ये निर्माण होणारी टाकाऊ माती, नको असलेले बांधकाम साहित्य आदींची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी कंत्राटदारांवरच सोपविण्यात आली आहे. मुंबईत हा कचरा टाकण्यासाठी जागाच नाही. त्यामुळे हा कचरा मुंबईबाहेर टाकण्याशिवाय कंत्राटदारांना गत्यंतर नाही. हा कचरा मुंबईबाहेर वाहून नेण्यासाठी कंत्राटदारांना पैसे मोजावे लागत आहेत. पैसे खर्च होऊ नयेत म्हणून कंत्राटदार हा कचरा काम पूर्ण झाल्यानंतरही तेथेच टाकून पळ काढतात.

कामे झाल्यानंतर कंत्राटदारांनी शिल्लक राहिलेले बांधकाम साहित्य, खोदकामानंतर निर्माण होणारी माती आदी तात्काळ हटवून रस्ता, पदपथ मोकळा करायलाच हवा. तसे न करणाऱ्या कंत्राटदारांना काही दिवस मुदत देण्यात येईल. त्यानंतरही कार्यस्थळी बांधकाम साहित्य, माती आढळली तर संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येईल. वेळप्रसंगी त्यांचे कामाचे पैसे रोखले जातील.

– अजोय मेहता, पालिका आयुक्त