पदपथांवरील अतिक्रमण हटविताना न्यायालयीन प्रकरणे उद्भवणार नाहीत याची काळजी घेऊन अतिक्रमणांवर बेधडक हातोडा चालविण्याचे आदेश पालिका आयुक्त अजय मेहता यांनी शनिवारी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. तसेच दोन दिवसांत आढावा घेणे शक्य नसल्याने महिनाभर काळजीपूर्वक सर्वेक्षण करून कारवाईला सुरुवात करावी, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले.

पालिकेचे उपायुक्त, विविध विभागांचे प्रमुख आणि साहाय्यक आयुक्तांची आढावा बैठक शनिवारी आयोजित करण्यात आली. या बैठकीत पदपथांवरील वाढत्या अतिक्रमणाबद्दल अजय मेहता यांनी चिंता व्यक्त केली. दुकानदार, उपाहारगृहे, व्यावसायिक आस्थापना आदींनी पदपथांवर मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमण केल्यामुळे पादचाऱ्यांना अडथळा होत आहे. याची गंभीर दखल घेत आपापल्या विभागात दोन दिवस सर्वेक्षण करून अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश २४ विभाग कार्यालयांतील साहाय्यक आयुक्तांना देण्यात आले होते. पालिका विभाग कार्यालयांची आणि अतिक्रमणांची व्याप्ती, तसेच उपलब्ध मनुष्यबळ लक्षात घेता दोन दिवसांमध्ये पदपथांवरील अतिक्रमणांच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण करणे अशक्य आहे. त्यामुळे आता महिन्याभरात सर्वेक्षणाचे काम पूर्ण करावे आणि कायदेशीर बाबी निर्माण होणार नाहीत, अशी अतिक्रमणे तात्काळ हलवावीत. दोन महिन्यांमध्ये ही कारवाई पूर्ण करावी. त्यानंतर कायदेशीर बाबी निर्माण होण्याची शक्यता असलेली प्रकरणे हाताळावीत, असे आदेश मेहता यांनी साहाय्यक आयुक्तांना दिले.

डेंग्यूचा पुन्हा धोका..

वातावरणातील वाढत्या बदलामुळे डेंग्यू पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य विभागाला सतर्क राहण्याचे आदेशही आयुक्त अजय मेहता यांनी दिले आहेत; तसेच उंच इमारतींत पालिका कर्मचाऱ्यांना प्रवेश नाकारण्यात येत असल्याची गंभीर दखल घेत त्यांनी संबंधित गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य न केल्यास कायदेशीर कारवाईचे संकेतही दिले आहेत.