स्थायी समितीसाठी आग्रही असलेल्या सत्ताधारी भाजपने पुन्हा एकदा शिक्षण आणि सुधार समितीवर समाधान मानल्यामुळे वैधानिक समित्यांच्या वाटपात शिवसेना-भाजपमध्ये निर्माण झालेल्या वादावर पडदा पडला आहे. येत्या सोमवारी स्थायी आणि शिक्षण समितीची निवडणूक होत आहे. त्यासाठी शनिवारी उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. शिवसेनेने स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी यशोधर फणसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. भाजप-सेनेत झालेल्या वाटाघाटीनुसार स्थायी आणि बेस्ट समिती शिवसेनेकडे राहणार असून शिक्षण आणि सुधार समितीवर भाजपचा अध्यक्ष असणार आहे. स्थायी आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक ६ एप्रिल रोजी होत आहे. तर सुधार आणि बेस्ट समितीची बैठक ८ एप्रिल रोजी होणार आहे.
बेस्ट समितीच्या अध्यक्षपदी अरविंद दुधवडकर यांच्या नावाला पुन्हा एकदा ‘मातोश्री’ने पसंती दर्शविली आहे. मात्र शिवसेनेचे बेस्ट समितीमधील सदस्य श्रीकांत कवठणकर अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे पेच निर्माण झाला आहे. भाजपने शिक्षण समितीसाठी भाजपला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष नगरसेविका ज्योती अळवणी यांचा विचार सुरू आहे. मात्र भाजपमधील काही नगरसेविकांनी त्यास विरोध केला आहे. सुधार समितीसाठी खासदार किरीट सोमय्या यांचे समर्थक प्रकाश गंगाधरे इच्छुक आहेत. मात्र उज्ज्वला मोडक यांना पुन्हा एकदा सुधार समिती अध्यक्षपदासाठी संधी देण्याचा विचार भाजपमध्ये सुरू असल्याचे समजते.