News Flash

पालिकेला तलाव भरण्याची चिंता

गतवर्षीच्या तुलनेत सध्या तीन लाख दशलक्ष लिटरची तूट

संग्रहित छायाचित्र

गतवर्षीच्या तुलनेत सध्या तीन लाख दशलक्ष लिटरची तूट

मुंबई : मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाची तुरळक हजेरी पालिकेची चिंता वाढवू लागली असून गतवर्षीच्या तुलनेत आजघडीला तलावांतील जलसाठय़ात तब्बल तीन लाख दशलक्ष लिटर इतकी तूट आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा जवळपास निम्म्याने कमी आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास पुढील वर्षभर मुंबईकरांची तहान भागविण्यासाठी पालिकेला तारेवरची कसरत करावी लागण्याची शक्यता आहे.

अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात तलावांमधून मुंबईकरांना वर्षभर पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबईकरांची तहान भागविण्यासाठी तलावांतील शुद्धीकरण केलेल्या ३,७५० दशलक्ष लिटर पाण्याचा दर दिवशी पुरवठा केला जातो. वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा करता यावा यासाठी तलावांमध्ये १ ऑक्टोबर रोजी १४.५० लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा असणे आवश्यक आहे.

यंदा जून महिना जवळजवळ कोरडाच गेला. जुलै महिनाही निम्मा सरला. जुलैच्या सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावली. त्यावेळी तलावातील जलसाठय़ाच्या स्थितीत चांगली सुधारणा झाली. मात्र गेल्या काही दिवसात पावसाची तुरळक हजेरी चिंता वाढवू लागली आहे. मुंबई महापालिकेने जारी केलेल्या १२ जुलै २०२०च्या आकडेवारीनुसार तलावांमध्ये तीन लाख ३९ हजार ०६७ दशलक्ष पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र गतवर्षी याच दिवशी तलावांमध्ये सहा लाख ५२ हजार ७२८ दशलक्ष लिटर इतके पाणी होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल तीन लाख १३ हजार ६६१ दशलक्ष लिटर पाण्याची तूट तलावांमध्ये आहे. पावसाने दडी मारली आणि जलसाठय़ातील तूट वाढत गेली तर भविष्यात मुंबईकरांना पाणीकपातीच्या संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तलावक्षेत्रात १२ जुलै रोजी पडलेला पाऊस

तलाव                      १२ जुलैचा पाऊस 

अप्पर वैतरणा              ३०

मोडकसागर                १६

तानसा                         ०४

मध्य वैतरणा               १४

भातसा                         ०९

विहार                           ५३

तुळशी                          ३९

(पाऊस मि.मी.मध्ये)

 

तलावक्षेत्रात                     १२ जुलैपर्यंत झालेला एकूण पाऊस

तलाव                                     २०२०         २०१९

अप्पर वैतरणा                       ६३१            ११२२

मोडकसागर                          ६०३             १३९४

तानसा                                  ५५५              ११३९

मध्य वैतरणा                        ७१२              ११६६

भातसा                                 ८२५                १३९९

विहार                                   ९८९               १५६३

तुळशी                                  १२५५              २०२७

(पाऊस मि.मी.मध्ये)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 2:22 am

Web Title: bmc concern over low rain in lakes supplying water to mumbai zws 70
Next Stories
1 सार्वजनिक ग्रंथालयांसमोर ग्रंथसंपदा जपण्याचे आव्हान
2 चित्रकलेचा पेपर फोडणाऱ्या दोन शिक्षकांवर गुन्हा
3 Coronavirus : करोनाबाधित बरे होण्याचे प्रमाण ७० टक्क्यांवर
Just Now!
X