|| प्रसाद रावकर जागतिक बँकेच्या आक्षेपानंतर महापालिकेचा निर्णय; जलजोडणी, मलवाहिन्या जोडणी प्रक्रियेत बदल मुंबईतील बांधकाम क्षेत्राला गती मिळावी यासाठी जागतिक बँकेच्या सूचनेवरून मुंबई महापालिकेने बांधकाम परवानगी प्रक्रियेतील परवानग्यांना आणखी कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार इमारतीच्या जल आणि मलवाहिन्या जोडणीच्या परवानगीमध्येही बदल करण्यात आले आहेत. यामुळे इमारत बांधकामाला वेग येईल अशी अपेक्षा आहे. इमारत बांधकामासाठी पालिकेच्या विविध विभागांकडून घ्यावी लागणारी परवानगी आणि त्यासाठी लागणाऱ्या कालावधीमुळे पुनर्विकासाचे प्रकल्प कासवगतीने पुढे सरकत होते. या प्रकल्पांना गती मिळावी यासाठी पालिकेने ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’अंतर्गत बांधकाम परवानग्यांची संख्या कमी केली. त्यामुळे आपोआपच परवानगी मिळण्याचा कालावधी कमी झाला. इमारत बांधकामासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येत असून परवानगी मिळविण्यासाठी ३७ ऐवजी आठ प्रक्रिया कराव्या लागत आहेत. पूर्वी ३७ प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता १२८ दिवस लागत. परवानग्या घेण्यास इतके दिवस लागत असल्याने इमारत बांधकाम क्षेत्रात मुंबई मागे पडून १९० देशांमध्ये तिचा क्रमांक १८१ वा लागला होता. मात्र आता आठ प्रक्रियांमुळे ६० दिवसांमध्ये परवानगीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. त्यामुळे मुंबईचा क्रमांक ५२ वर स्थिरावला आहे. अर्थात पालिकेच्या आठ प्रक्रियांबाबतही जागतिक बँकेने आक्षेप नोंदविला आहे. या प्रक्रिया आठ नसून त्या प्रत्यक्षात २० असल्याचे जागतिक बँकेचे म्हणणे आहे. परिणामी परवानगी मिळण्यास ९० दिवसांचा कालावधी लागत असल्याचे जागतिक बँकेचे म्हणणे आहे. मुंबईतील काही वास्तुविशारद आणि विकासकांकडे सर्वेक्षणातून जागतिक बँकेने हा निष्कर्ष काढला आहे. त्यामुळे पालिकेने या प्रक्रियेमध्ये पुन्हा सुधारणा केली आहे. इमारत बांधकामासाठी अर्ज प्राप्त होताच विविध विभागांकडून जागेची पाहणी केली जाते. त्यात वाया जाणारा वेळ लक्षात घेत संबंधित सर्व विभागांची संयुक्त पाहणी करण्याचा तोडगा काढण्यात आला आहे. पाहणी झाल्यानंतर १५ दिवसांमध्ये ‘ना हरकत’ देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे पाहणी आणि त्यानंतर ‘ना हरकत’ देण्यासाठी लागणारा वेळ वाचेल, असा विश्वास अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या सुधारणांमुळे जागतिक स्तरावर बांधकाम व्यवसायात मुंबईचा क्रमांक पहिल्या १० मध्ये लागेल, असा विश्वासही अधिकाऱ्याने व्यक्त केला. नव्या सुधारणा काय? इमारत बांधकामासाठी अर्ज करणे, पैसे भरण्यास सांगणे, प्रत्यक्ष पैसे भरणे, विश्लेषण करणे अशा काही प्रक्रिया ऑनलाइनच्या माध्यमातून कमी. इमारतीचे बांधकाम झाल्यानंतर नळजोडणी, मलनिस्सारण वाहिन्यांबाबतचा परवानगीचा अर्ज व त्याची अंमलबजावणी आदी प्रक्रिया एकाच वेळी. नळजोडणी वा मलनिस्सारण वाहिन्यांबाबत परवानगी दिल्यानंतर त्याची माहिती संबंधित विभागातील अभियंत्यापर्यंत संगणकीय प्रणालीमार्फत उपलब्ध. इमारत बांधकाम परवानगी जलदगतीने मिळावी, त्यात पारदर्शकता यावी आणि सर्वाना समान न्याय मिळावा या उद्देशाने या सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सुधारणांमुळे जागतिक स्तरावर बांधकाम व्यवसायात मुंबईला आघाडीचे स्थान मिळू शकेल. -अजोय मेहता, पालिका आयुक्त