काम देण्यास पालिकेचा नकार; पार्थिव मुख्यालयात नेण्याचा प्रयत्न अयशस्वी

न्यायालयाने आदेश दिलेले असतानाही पालिका अधिकाऱ्यांनी गेले तीन महिने काम नाकारल्याने निराश झालेल्या कंत्राटी सफाई कामगार सुमती देवेंद्र (२७) हिने बुधवारी विलेपार्ले येथील नेहरू नगरमधील घरात गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या कंत्राटी सफाई कामगारांनी गुरुवारी आझाद मैदानावर निषेध आंदोलन केले. तसेच सुमतीचे पार्थिव पालिका मुख्यालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी बॅरिकेटने रस्ता बंद करुन पालिकेच्या आवारात जाणारी रुग्णवाहिका रोखून धरली. त्यामुळे कामगारांनी घोषणाबाजी करून प्रशासनाचा निषेध केला.

पालिकेच्या ‘के-पश्चिम’ विभाग कार्यालयाच्या हद्दीमध्ये सफाई करण्याचे काम सुमती देवेंद्र करीत होती. न्यायालयाच्या आदेशानुसार तिच्यासह अनेक कंत्राटी कामगारांना सफाईचे काम देण्यात येत होते. मात्र गेल्या तीन दिवसांपासून सुमतीला काम देण्यास पालिका अधिकाऱ्यांकडून नकार दिला जात होते. पालिका अधिकारी आणि कार्यालयातील रखवालदारांकडून केली जाणारी अहवेलना आणि मुलीची होत असलेली उपासमार यामुळे सुमती खचली होती.

अखेर विलेपार्ले येथील नेहरू नगरमधील घरात बुधवारी तिने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे कंत्राटी सफाई कामगारांमध्ये उद्रेक झाला आणि सफाई कामगारांनी बुधवारी आझाद मैदानात निषेध आंदोलन केले. संतप्त झालेल्या कामगारांनी सुमतीचे पार्थिव गुरुवारी संध्याकाळी पालिका मुख्यालयात आणण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे पालिका मुख्यालयाच्या सर्व प्रवेशद्वारांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

संध्याकाळी रुग्णवाहिकेतून सुमतीचे पार्थिव आझाद मैदान परिसरात दाखल झाले. सफाई कामगारांनी रुग्णवाहिका थेट पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रवेशद्वाराजवळ तैनात असलेले पालिकेचे सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी सफाई कामगारांचा डाव उधळून लावला. तात्काळ बॅरिकेट उभारून रुग्णवाहिकेचा मार्ग रोखण्यात आला. त्यामुळे पालिका मुख्यालय मार्गावर जमलेल्या सफाई कामगारांनी घोषणाबाजी करीत पालिका प्रशासनाचा निषेध केला.

न्यायालयाने आदेश दिलेले असतानाही सफाई कामगारांना काम देण्यास पालिका अधिकारी नकार देत आहेत. सफाई कामगारांना अपमानास्पद वागणूक दिली जाते आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार या कामगारांना काम द्यावे, अन्यथा आणखी एक आंदोलन करावे लागेल.

मिलिंद रानडे, कचरा वाहतूक श्रमिक संघ