पालिकेत ‘अभासे अधिभारा’च्या नावाखाली पैसे मागण्यात येत असतील, तर कंत्राटदारांनी त्याबाबत तक्रार करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करावी, असे आरोग्य समिती अध्यक्षा गीता गवळी यांनी स्पष्ट केले.
‘लोकसत्ता’च्या बुधवारच्या अंकामध्ये ‘अभासे अधिभारा’मुळे पालिका कंत्राटदार त्रस्त’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध होताच खळबळ उडाली. या वृत्ताबाबत स्पष्टीकरण देताना गीता म्हणाल्या की, रुग्णालये, दवाखान्यांना लागणाऱ्या साहित्य खरेदीचे प्रस्ताव आरोग्य समितीपुढे येत नाहीत. त्यांना स्थायी समितीमध्ये मंजुरी मिळते आणि प्रशासन कंत्राटदाराची नियुक्ती करते. त्यामुळे कंत्राटदाराकडून ‘अधिभार’ घेण्याचा प्रश्नच येत नाही. आरोग्य समितीची अध्यक्ष व स्थायी समितीची सदस्य असले तरी आपल्याला वेगळे अधिकार नाहीत. त्यामुळे कंत्राटदार नियुक्तीत हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच येत नाही. कंत्राटदाराचा तसा आक्षेप असेल तर त्याने पालिका आयुक्तांकडे तक्रार करून संबंधितांवर कारवाईची मागणी करावी. अभासेच्या बदनामीचा कट कुणी तरी रचल्याचा आरोपही त्यांनी केला.