पालिका प्रशासनाकडून प्रस्ताव स्थायी समितीकडे

मुंबई : करोनामुळे पालिकेचा खर्च वाढलेला आहे, उत्पन्न घसरलेले असल्यामुळे भांडवली खर्चासाठी पालिकेने अंतर्गत कर्ज घेण्याबाबत पालिकेच्या अर्थसंकल्पात सूतोवाच केले होते. त्यानुसार विविध विकासकामांसाठी चार हजार कोटींचे कर्ज शिलकीतून काढण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने पालिकेकडे पाठवला आहे. या निधीतून पुलांची व पर्जन्यजल वाहिन्यांची कामे विशेषत्वाने करण्यात येणार आहेत.

करोना व टाळेबंदीमुळे पालिकेच्या एकूणच अर्थव्यवस्थेवर व पालिकेच्या महसुली स्रोतांवर विपरीत परिणाम झाला आहे. पालिकेचा भांडवली खर्चही वाढला आहे. करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरता आतापर्यंत पालिकेने २००० कोटींहून अधिक खर्च केले आहेत. तसेच भांडवली खर्चातही चालू आर्थिक वर्षात आठ हजार कोटींची वाढ झाली आहे. मात्र कमी उत्पन्न आणि विकासकामांसाठी आवश्यक खर्च या जमाखर्चाची मिळवणी करण्याक रता पालिका प्रशासनाने अंतर्गत कर्ज घेण्याचे ठरवले आहे. त्याबाबत पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सन २०२१-२२च्या अर्थसंकल्पात सूतोवाच केले होते. प्रत्यक्षात विविध विकासकामांसाठी पालिकेला ७८८४ कोटींची गरज आहे, मात्र त्यापैकी आता चार हजार कोटी रुपये शिलकीतून काढून त्यातून विशेष प्रकल्पांसाठी निधी निर्माण करण्यात येणार आहे. शिवाय, ५८७६ कोटींचा निधी या आर्थिक वर्षात अंतर्गत कर्जाद्वारे उभारण्यात  येणार आहे.

विविध प्राधिकरणांकडे निधी अडकला

पालिकेचे उत्पन्न टाळेबंदीमुळे कमी झाले आहेच, पण विविध प्राधिकरणांकडे व राज्य सरकारकडेही पालिकेचा निधी अडकला आहे. तसेच मालमत्ता करवसुलीची संचित थकबाकी १५ हजार कोटींच्या पुढे आहे. त्यामुळे पालिकेचे उत्पन्न घटले आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे जमीन अधिमूल्यापोटी ६१८ कोटी रुपये, तर पायाभूत सुविधा विकास आकारापोटी ९८२ कोटी असे १६०० कोटी रुपये अडकले आहेत. पालिकेच्या ८० हजार कोटींच्या मुदत ठेवी आहेत, मात्र रेपो रेट कमी होत असल्यामुळे मुदत ठेवींवरील व्याजदरही घटला आहे. त्यामुळे व्याजापोटी मिळणाऱ्या उत्पन्नांतही घट झाली आहे.

 

ही कामे हाती घेणार

मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एमआरआयडीसीएल) मार्फत १६७५ कोटींची १२ पुलांची कामे

मुंबई हद्दीतील अडीचशे कोटींची अन्य पुलांची कामे

मिठी नदी, पोयसर, दहिसर वालभट नदी संबंधातील मोठ्या प्रमाणातील कामे

नवीन पर्जन्य जलवाहिन्या पम्पिंग स्टेशन, बोगद्यांची कामे

उत्पन्न घटले

सन २०२०-२१ मध्ये महसुली उत्पन्न २८,४४८.३० कोटी एवढे अपेक्षित होते, मात्र प्रत्यक्षात त्यात ५८७६.१७ कोटींची घट झाली.

सन २०२१-२२ मध्ये पालिकेला २७,८११.५७ कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. हा अंदाज गेल्या आर्थिक वर्षांपेक्षा कमी आहे.