मतांच्या जोगव्यासाठी पालिकेच्या निधीतून कचराकुंडय़ांचे वाटप

फेब्रुवारीमध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर त्यावेळच्या बहुसंख्य तत्कालिन नगरसेवकांनी घरोघरी पोहोचण्यासाठी कचराकुंडीचा आधार घेतल्याचे उघडकीस आले आहे. पालिकेतर्फे दोन वर्षांमध्ये १२ लाख ४८ हजार कचराकुंडय़ांचे वितरण करण्यात येणार होते. परंतु पहिल्याच वर्षी तब्बल ११ लाख कचराकुंडय़ा घरोघरी पोहोचत्या करुन मतदारांना भुलविण्याचा प्रयत्न तत्कालिन नगरसेवकांनी केल्याचे पुढे आले आहे. घरामध्ये ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवण्यासाठी मुंबईकरांना घरटी दोन कचराकुंडय़ा वितरित करण्याचा पालिकेचा मानस आहे. मात्र पहिल्याच वर्षी तत्कालिन नगरसेवकांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कचराकुंडय़ांची लूट केल्यामुळे आता पुन्हा एकदा मोठय़ा प्रमाणावर कचराकुंडय़ा खरेदी करण्याचा विचार पालिका करीत आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात पार पडली. तत्पूर्वी २०१६ मध्ये तत्कालिन नगरसेवक निवडणुकीच्या तयारीला लागले होते. मतदारांच्या दारापर्यंत पालिकेच्या सुविधा पोहोचत्या करण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. मुंबईमधील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्याची कल्पना असलेल्या त्या वेळच्या नगरसेवकांनी नगरसेवक निधीमध्ये म्हणजेच पालिकेच्याच पैशात घरोघरी १० लिटर क्षमतेच्या कचराकुंडय़ा पोहोचत्या करता याव्यात यासाठी धडपड सुरू केली होती. कचराकुंडीच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचता यावे यासाठी सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी त्यावेळी प्रशासनाला खडे बोल सुनावत नगरसेवक निधीमधून कचराकुंडय़ा खरेदी करण्यास भाग पाडले.

प्रशासनाने २०१६-१७ आणि २०१७-१८ या आर्थिक वर्षांमध्ये तब्बल १२ लाख ४८ हजार कचराकुंडय़ा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. निविदा प्रक्रियेअंती निलकमल या कंपनीकडून प्रति कचराकुंडी ९४ रुपयांना खरेदी करण्यावर शिक्कामोर्तब झाले.

या कचराकुंडय़ावर प्रभाग क्रमांक, संबंधित नगरसेवकाचे नाव प्रकाशित करण्यात आले होते. त्यामुळे कचराकुंडय़ांच्या निमित्ताने मतदारांच्या घराघरात पोहोचण्याची आयत्या चालून आलेल्या संधीचा अनेक माजी नगरसेवकांनी लाभ घेतला.

पक्षाचे प्राबल्य कमी असलेल्या परिसरात कचराकुंडय़ांचे वापट करुन मतदारांना भुलविण्याचा प्रयत्न सर्वच पक्षांच्या माजी नगरसेवकांनी केला. त्यामुळे माजी नगरसेवकांना कचराकुंडय़ा पुरविताना पालिका प्रशासन आणि कंत्राटदाराची दमछाक झाली. प्रशासनाने साधारण सप्टेंबर २०१६ पासून कचराकुंडय़ांचे वितरण सुरू केले. फेब्रुवारीमध्ये पालिकेची निवडणूक होण्याची शक्यता लक्षात घेत माजी नगरसेवकांनी मोठय़ा संख्येने कचराकुंडय़ा मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले होते. दोन वर्षांमध्ये १२ लाख ४८ हजार कचराकुंडय़ा वितरित करावयाच्या होत्या. पण माजी नगरसेवकांच्या वाढत्या मागणीमुळे पालिका निवडणुकीपूर्वीच तब्बल ११ लाख कचराकुंडय़ांचे वितरण झाले. पालिका निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवकांनी मागणी करताच उरलेल्या कचराकुंडय़ांचे प्रशासनाने वितरण करुन टाकले.

नव्याने खरेदी

‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत घरोघरी स्वच्छता राखली जावी, ओला आणि सुका कचरा स्वतंत्र ठेवला जावा यासाठी घरोघरी दोन स्वतंत्र कचराकुंडय़ांचे वितरण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. दोन वर्षांसाठी करार झालेला असताना १२ लाख ४८ हजारपैकी ११ लाख कचराकुंडय़ा पहिल्याच वर्षी संपल्याने आता पुन्हा एकदा कचराकुंडय़ा खरेदी करण्याची वेळ पालिकेवर ओढवली आहे.