दुष्काळग्रस्त भागातील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने स्थलांतर करू लागले असून दुष्काळग्रसांना मदतीचा हात देण्यासाठी मुंबईतील नगरसेवक पुढे सरसावले आहेत. पालिकेकडून मिळणारे एक महिन्याचे मानधन नगरसेवकांनी दुष्काळग्रस्तांना देण्याची तयारी दर्शविली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या १४ नगरसेवकांनी आपली १.४० लाख रुपये मानधनाची रक्कम पालिका आयुक्त अजय मेहता यांच्याकडे गुरुवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीच्या पावलावर पाऊल टाकत सत्ताधारी शिवसेना, भाजपसह मनसे आणि समाजवादी पार्टीच्या नगरसेवकांनीही मानधनाची रक्कम देण्याचा मानस व्यक्त केला आहे.
विदर्भ, मराठवाडय़ात दुष्काळ पडल्यामुळे अनेक दुष्काळग्रस्तांनी मुंबईची वाट धरली आहे. या दुष्काळग्रस्तांसाठी निवारा, अन्नधान्य आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी सोमवारी पालिका सभागृहात केली होती.

सुमारे २३ लाख २० हजारांचा निधी
राष्ट्रवादीच्या १४ नगरसेवकांना मिळणारी १.४० लाख रुपये मानधनाची रक्कम मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर यांच्या उपस्थितीत गटनेते धनंजय पिसाळ २१ एप्रिल रोजी अजय मेहता यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी घोषणा करताच शिवसेना, भाजप, सपा आणि मनसेच्या नगरसेवकांनीही दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप गटनेते मनोज कोटक यांनी पक्षाच्या नगरसेवकांचे मानधन मुख्यमंत्री निधीत जमा करण्यात यावे, असे विनंती करणारे पत्र महापौर स्नेहल आंबेकर यांना पाठविले आहे. नगरसेवकांच्या मानधनातून सुमारे २३ लाख २० हजार रुपये रक्कम निधी जमा होणार आहे.