दरवर्षी हिवाळ्यात करदात्यांच्या पैशांमध्ये पालिकेच्या वैधानिक आणि विशेष समित्यांच्या सदस्यांचे निघणारे अभ्यास दौरे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या पाश्र्वभूमीवर अभ्यास दौऱ्याचा अहवाल आणि सदस्यांच्या निरीक्षणांची अंमलबजावणी याबाबतची माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्याची मागणी शिवसेनेच्या नगरसेवकाने करून सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला आहे.
मुंबईतील लोकसंख्या इतर शहरांच्या तुलनेत अधिक असून पालिकेकडून मुंबईकरांना विविध नागरी सुविधा पुरविल्या जात आहेत. मात्र वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नागरी सुविधांमध्ये सुधारणा करणे गरजेचे बनले आहे. त्याचबरोबर सुविधांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची गरज आहे. याच धर्तीवर परराज्यांतील शहरांमध्ये नागरी सुविधा कशा पुरविण्यात येत आहेत. तेथील महापालिका कसे काम करते आदींची पाहणी करण्यासाठी वैधानिक आणि विशेष समित्यांच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात येते. समित्यांचे सदस्य मोठय़ा उत्साहाने दौऱ्यांवर रवाना होत असतात. करदात्या मुंबईकरांनी पालिकेच्या तिजोरीत कररूपात जमा केलेले लाखो रुपये दौऱ्यासाठी खर्च केले जातात.समिती सदस्य या दौऱ्यामध्ये संबंधित शहरांतील महापालिकेला भेट देतात. महापौर, राजकारणी, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गाठीभेटीही घेतात. तेथे राबविण्यात येणाऱ्या योजना, पुरविल्या जाणाऱ्या नागरी सुविधांबाबत चर्चाही करतात. कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जाते, पाणीपुरवठा कसा केला जातो, रस्ते बांधणीची कामे कशी होतात याविषयी संबंधितांशी मुंबईतील नगरसेवक चर्चाही करतात. परंतु मुंबईत परतल्यानंतर समितीच्या बैठकीत किंवा सभागृहामध्ये दौऱ्यामध्ये पाहिलेल्या, अनुभवलेल्या सुविधांबाबत चकार शब्दही काढत नाहीत. त्यामुळे अभ्यास दौऱ्यातून काही तरी भरीव उद्दिष्ट साध्य झाल्यास करदात्यांच्या पैशांचा चांगला विनियोग होऊ शकतो. अभ्यास दौऱ्यानंतर प्रशासकीय कर्मचारी किंवा अभ्यास दौरा समितीने अंमलबजावणीच्या आराखडय़ासह अहवाल सादर करावा. हा अहवाल पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करावा, अशी मागणी शिवसेनेचे नामनिर्देशित नगरसेवक प्रा. अवकाश जाधव यांनी केली. तसेच खर्च होणाऱ्या पैशांचा विनियोग होईल व महापालिकेसाठी तो दौरा मार्गदर्शक ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.