मुंबई : करोनाच्या संसर्गाचे थैमान सुरू असताना त्याला प्रतिबंध करण्यासाठी काही अटीसापेक्ष नगरसेवक निधीमधून १० लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची परवानगी नगरसेवकांना देण्यात आली आहे. त्यानुसार अलगीकरणाची व्यवस्था, करोनाशी लढणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेची, तसेच पालिका रुग्णालयात आवश्यक ती साधने उपलब्ध करण्यासाठी नगरसेवक निधीतील १० लाख रुपये खर्च करता येणार आहेत.

मुंबईमध्ये करोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर अनेक नगरिक मदतीसाठी नगरसेवकांकडे धाव घेत आहेत. नागरिकांना मदत करता यावी यासाठी नगरसेवक निधीतून खर्च करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी नगरसेवकांकडून करण्यात येत होती. याबाबत प्रसासनाने सोमवारी परिपत्रक जारी करीत करोनाबाबत उपाययोजना करण्यासाठी नगरसेवक निधीतून १० लाख रुपयांपर्यंत खर्च करण्यास परवानगी दिली आहे. मात्र १० लाख रुपये कोणत्या गोष्टींसाठी खर्च करता येतील हेही परिपत्रकात नमूद केले आहे.

रुग्णांसाठी मोठय़ा प्रमाणावर अलगीकरण व्यवस्था करणे, तेथे खाटा आणि लॉकरची व्यवस्था करणे, करोनाचा मुकाबला करण्यासाठी कार्यरत असलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना स्वसंरक्षणासाठी पीपीई किट, एन-९५ मास्क, हातमोजे, सॅनिटायझर, डिसइन्फेक्टेड पावडर, पालिका रुग्णालयासाठी मिनी ऑक्सिजन सिलिंडर, डिजिटल थर्मल स्कॅनर, स्टेथोस्कोप, ग्लुकोमीटर पल्स ऑक्सिमीटर फिंगर आदी साहित्यासाठी नगरसेवक निधीमधील १० लाख रुपये खर्च करण्याची परवानगी नगरसेवकांना देण्यात आली आहे. तसेच नगरसेवक निधीमधून दवाखाने, प्रसूतिगृह, सार्वजनिक शौचालये, पालिकेच्या चौक्यांमध्ये वॉकथ्रू सॅनिटायझर उभारणीही करता येणार आहे.

करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत नागरिकांना मदत करता यावी यासाठी प्रत्येक नगरसेवकाला २५ लाख रुपये निधी उपलब्ध करण्याची मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली होती. मात्र प्रशासनाने नगरसेवकांना अटीसापेक्ष नगरसेवक निधीतून १० लाख रुपये खर्च करण्याची परवानगी दिली आहे.

मात्र या निधीचा वापर नागरिकांना धान्य वा अन्य वस्तू वाटपासाठी करता येणार नाही. त्यामुळे नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

नगरसेवकांना महापौर निधीतून मदत मिळणार

प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासकडून महापौर निधीमध्ये जमा करण्यात येणाऱ्या चार कोटी रुपयांच्या मदत निधीमधील काही रक्कम नगरसेवकांना उपलब्ध करण्यात येणार आहे. नगरसेवकांना आपल्या विभागातील नागरिकांना मास्क, सॅनिटायझर आदी वस्तू देता याव्या यासाठी ही रक्कम त्यांना देण्यात येणार आहे. प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासतर्फे महापौर निधीमध्ये चार कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे. हा निधी करोनाचा मुकाबला करण्यासाठी वापरण्याचा मानस महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला आहे. नागरिकांना मदत करता यावी यासाठी यातील काही रक्कम नगरसेवकांना उपलब्ध करण्यात येईल, असेही किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले.