07 March 2021

News Flash

कर्मचारी ‘रजेविना गैरहजर’

पालिका प्रशासनाचा बडगा; संघटनांची आंदोलनाची तयारी

संग्रहित छायाचित्र

पालिका प्रशासनाचा बडगा; संघटनांची आंदोलनाची तयारी

मुंबई : टाळेबंदीच्या काळात गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन कापले जात असतानाच त्यांच्याबाबत कठोर कारवाईचा बडगा प्रशासनाने उचलला आहे. जितके दिवस कर्मचारी रजेवर असेल तो कालावधी ‘रजेविना गैरहजर’ म्हणून ग्राह्य़ धरला जाणार आहे. हा कालावधी सेवेत न मोजण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून त्याविरोधात कर्मचारी संघटनांनी कायदेशीर लढा देण्याची तयारी सुरू केली आहे.

महापालिकेने पालिका कर्मचाऱ्यांना १०० टक्के हजेरी सक्तीची केली आहे. त्याचबरोबर बायोमेट्रिक हजेरीवरूनही वातावरण तापलेले आहे. त्यातच पालिकेने आता गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात कडक आणि कठोर पावले उचलली आहेत. गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘रजेविना गैरहजर’ ठरवले जात आहे. मात्र, हा निर्णय नैसर्गिक न्यायाला धरून नसल्याचे मत मुंबई मनपा कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे अ‍ॅड. प्रकाश देवदास यांनी व्यक्त केले आहे. पालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून मग ही कारवाई करावी, असेही देवदास यांचे म्हणणे आहे.

अनेक कर्मचारी टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात गावी गेले होते, तिथे अडकून पडले होते. अशा कर्मचाऱ्यांचा पंधरा दिवस, महिनाभराचा कालावधी रजेविना गैरहजेरी धरला जाणार आहे. त्यामुळे त्यांचे नुकसान होणार आहे. गावाहून येण्यास वाहन न मिळाल्यामुळे एखादा कर्मचारी नाही येऊ शकला तर त्याचा विचार केला पाहिजे. तर काही कर्मचारी स्वत: आजारी किंवा घरचे सदस्य आजारी होते. अशांचे मोठे नुकसान यामुळे होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली पाहिजे, असे मत देवदास यांनी मांडले आहे.

टाळेबंदीमुळे प्रवास करणे अवघड झाले आहे. त्यात पालिकेचे कर्मचारी महामुंबईच्या कानाकोपऱ्यातून येतात. तसेच आयत्या वेळी येणाऱ्या अडचणीही त्यामुळे सरसकट  हा निर्णय घेणे योग्य नाही. त्यामुळे प्रशासनाने कर्मचाऱ्यांना रजेविना गैरहजर ठरवण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा. अन्यथा न्यायालयात दाद मागू असा इशारा अ‍ॅड. देवदास यांनी दिला. तसेच याबाबत तक्रारी असल्यास संबंधित संघटनेकडे संपर्क करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

‘रजेविना गैरहजेरी’ म्हणजे काय ?

भरपगारी रजा, बिनपगारी रजा आणि रजेविना गैरहजेरी असे तीन प्रकार आहेत. रजेविना गैरहजेरी नोंदवली गेली तर त्या कालावधीतील वेतन तर मिळणार नाहीच या शिवाय कर्मचारी या काळात सेवेत नसल्याचे मानले जाईल. रजेविना गैरहजर म्हणजे हा कालावधी तुमच्या सेवा कालावधीत धरला जात नाही. सेवानिवृत्तीनंतरची देणी देताना या दिवसांचा विचार केला जात नाही. ठरावीक कालावधीची सेवा केल्यानंतर बढती, वेतनवाढ मिळत असते. त्यामुळे त्यांच्या बढतीवर, वेतनवाढीवर ग्रॅच्युएटीवर तसेच निवृत्तिवेतनावरही परिणाम होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 2:09 am

Web Title: bmc cut employees salaries who were absent during lockdown period zws 70
Next Stories
1 कलाकार, तंत्रज्ञांना महिनाभराचे मानधन
2 ठाकरे सरकारचा कारभार ‘अतिरिक्त’वर !
3 मुंबईत दिवसभरात १,३१० रुग्ण
Just Now!
X