20 October 2020

News Flash

मुंबईतील दहा विभागांत दररोज ५०० चाचण्या

करोना रुग्ण वाढत असलेल्या परिसरांवर लक्ष; मुंबई महापालिकेचा निर्णय

करोना रुग्ण वाढत असलेल्या परिसरांवर लक्ष; मुंबई महापालिकेचा निर्णय

मुंबई : करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असलेल्या मुंबईतील दहा प्रशासकीय विभागांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. यात शहरातील धारावी, माहीम, दादर, पश्चिम उपनगरांतील बोरिवली, कांदिवली, दहिसर, मालाड, तर पूर्व उपनगरांतील भांडुप, घाटकोपर, मुलुंड, गोवंडी, कुर्ला या परिसरांचा समावेश आहे.

या विभागांमध्ये दररोज किमान ५०० जणांची करोना चाचणी करण्याचे आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी संबंधित साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

मुंबईमधील रुग्णदुपटीचा काळ सरासरी ८६ दिवसांवर पोहोचला आहे, तर रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण ८१ टक्क्य़ांवर पोहोचले आहे. मात्र मुंबईमधील पालिकेच्या काही प्रशासकीय विभागांमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, या विभागांमध्ये रहिवाशांच्या तपासणीवर भर देण्यात येत आहे. त्याचबरोबर रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना सुविधा असल्यास गृह विलगीकरणात अथवा संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येत आहे.

शहरातील ‘जी-उत्तर’ विभागात धारावी, माहीम आणि दादर परिसराचा समावेश येतो. गेल्या काही दिवसांपासून धारावीमधील रुग्णसंख्या नियंत्रणात येऊ लागली आहे. मात्र त्याच वेळी दादर आणि माहीममधील रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. पश्चिम उपनगरांतील दहिसर (आर-उत्तर), कांदिवली (आर-दक्षिण), बोरिवली (आर-मध्य), मालाड (पी-उत्तर), पूर्व उपनगरांतील भांडुप (एस), एन (घाटकोपर), टी (मुलुंड), गोवंडी (एम-पूर्व), कुर्ला (एल) या विभागांमध्ये रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठीचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. त्यामुळे या विभागांवर लक्ष केंद्रित करून व्यापक प्रमाणावर बाधित आणि संशयित रुग्णांचा शोध घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठीच या भागांमध्ये दर दिवशी ५०० जणांची करोना चाचणी करण्याचे आदेश इक्बाल सिंह चहल यांनी संबंधित विभाग कार्यालयांतील साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.  आर-उत्तर, एम-पूर्व विभागात एकूण रुग्णसंख्या कमी असली तरी आता या भागात रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे तेथेही चाचण्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या विभागांवर विशेष लक्ष

विभाग             एकूण रुग्ण   करोनामुक्त         मृत्यू      सक्रिय रुग्ण

जी-उत्तर            ७६३२             ६२१२            ४७३             ९४७

आर-उत्तर          ३२८२              २६१०            १४३           ५२९

आर-दक्षिण         ६०९१            ४८८१            २०४           १००६

आर-मध्य           ६७३२              ५३२७              २४७       ११५८

पी-उत्तर             ७७८६              ६७२४              ३४१        ७२१

एस                      ७०९६              ५८७९              ४४१        ७७६

एन                      ६६९६              ५६५१              ३८९        ६५६

टी                       ५५७०              ४६५२              १६४        ७५४

एम-पूर्व            ४५३७              ३६७९              ३०६        ५५२

एल                   ५६२६              ४६६६              ४३०         ५३०

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 1:39 am

Web Title: bmc decide 500 tests per day in ten sections of mumbai zws 70
Next Stories
1 करोना धास्तीपायी ब्युटी पार्लर, सलूनला अल्प प्रतिसाद
2 चेंबूरमधील पालिकेचे रुग्णालय करोनामुक्त
3 मुंबईत आता १० टक्केच पाणीकपात
Just Now!
X