मुंबई : करोनाबाधित रुग्णांसाठी मोठय़ा प्रमाणावर खाटांची निर्मिती केली असल्याचा दावा पालिकेने केलेला असला तरी प्रत्यक्षात खाटा उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागत आहे. खाटांच्या व्यवस्थापनाचे सगळे प्रयोग फसल्यानंतर पालिकेने आता विभाग स्तरावर नियंत्रण कक्ष (वॉर रूम) स्थापन करण्याचे ठरवले आहे.

करोना रुग्णांना खाटा उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेने केंद्रीय पद्धतीने खाटा व्यवस्थापन प्रणाली आणली मात्र तरीही खाटा उपलब्ध होण्यासाठी येत असलेली अडचण निकाली काढण्यासाठी आता विकेंद्रित पद्धत सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी विभाग कार्यालयांच्या पातळीवर विभागीय नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. याद्वारे खाटांचे व रुग्णवाहिकांचे व्यवस्थापन केले जाणार आहे.

सध्या महानगरपालिकेच्या नागरी मदत सेवा क्रमांक १९१६ द्वारे प्राथमिक व्यवस्थापन करण्यात येते. मात्र त्यामुळे या यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहेच, पण करोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे ही व्यवस्थाही तोकडी पडू लागली आहे. १९१६ या हेल्पलाइनवर मोठय़ा प्रमाणावर दूरध्वनी येत असल्यामुळे रुग्णांना अनेक तास प्रतीक्षा करावी लागते. यापुढे मात्र खाटांसंदर्भात प्राप्त होणारे दूरध्वनी ‘वॉर्ड वॉर रूम’कडे वळते केले जाणार आहेत.

महानगरपालिकेच्या किंवा शासकीय रुग्णालयांमध्ये थेट येणाऱ्या बाधित किंवा संशयित रुग्णास योग्य ते उपचार देणे किंवा जवळपासच्या जम्बो फॅसिलिटीमध्ये त्यांना दाखल करणे याबाबतचा निर्णय संबंधित रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी घ्यायचा आहे, असे निर्देश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

असे होईल काम

करोनाबाधित रुग्णांची यादी प्राप्त झाल्यानंतर नियंत्रण कक्षातील डॉक्टर या रुग्णांशी संपर्क साधून, त्यांना असलेल्या बाधेचे स्वरूप समजावून घेऊन रुग्णास कोव्हिड आरोग्य केंद्र किंवा रुग्णालयामध्ये योग्य व आवश्यक खाट मिळवून देण्याची जबाबदारी पार पाडतील. त्या ठिकाणी रुग्णाला नेण्याबाबतच्या कार्यवाहीमध्ये समन्वय साधला जाईल. तीव्र लक्षणे असल्यास रुग्णाच्या घरी जाऊन त्याची तपासणी करणे, त्याआधारे तातडीने खाट उपलब्ध करून देणे, समन्वय साधणे, रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्णालयांमध्ये बाधित व्यक्तीला पोचवणे, ही सर्व कार्यवाही ‘वॉर्ड वॉर रूम’ स्तरावर केली जाणार आहे. उपलब्ध सर्व खाटांची माहिती ऑनलाइन प्रणालीवर ‘वॉर्ड वॉर रूम’ द्वारे अद्ययावत केली जाणार आहे.

विभागीय नियंत्रण कक्षाचे स्वरूप

* महानगरपालिकेच्या सर्व विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या विभाग कार्यालय स्तरावर हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावयाचा आहे.

* प्रत्येक ‘वॉर्ड वॉर रूम’मध्ये दिल्या जाणाऱ्या दूरध्वनी क्रमांकाच्या ३० वाहिन्या असतील.

* चोवीस तास अखंडपणे चालणाऱ्या या कक्षात तीन सत्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी, आवश्यक इतर कर्मचारी यांची नियुक्ती केली जाणार आहे.

खासगी खाटांचे व्यवस्थापन पाच सनदी अधिकाऱ्यांकडे

मुंबई : राज्य सरकारच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने खासगी रुग्णालयांतील ८० टक्के खाटा ताब्यात घेतल्या असून सर्वसामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयांमधील खाटा उपलब्ध व्हाव्या यादृष्टीने व्यवस्थापन करण्याकरिता सरकारने पाच सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.  खाट मिळत नसल्यास नागरिकांनी या अधिकाऱ्यांना इमेलद्वारे कळवावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

अधिकारी आणि त्यांच्याकडील रुग्णालये

* मदन नागरगोजे  (covid19nodal1@mcgm.gov.in)- बॉम्बे हॉस्पिटल, सैफी रुग्णालय, जसलोक रुग्णालय, ब्रीच कँडी रुग्णालय, एच. एन. रिलायन्स रुग्णालय, भाटिया रुग्णालय, कॉन्वेस्ट अ‍ॅण्ड मंजुला एस. बदानी जैन हॉस्पिटल.

* अजित पाटील  (covid19nodal2@mcgm.gov.in) – मसिना रुग्णालय, वोक्हार्ट हॉस्पिटल, प्रिन्स अली खान रुग्णालय, ग्लोबल रुग्णालय, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, के. जे. सोमय्या रुग्णालय, गुरू नानक रुग्णालय, पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल.

* प्रशांत नारनवरे (covid19nodal3@mcgm.gov.in) – करुणा रुग्णालय , कोकिळाबेन रुग्णालय, संजीवनी रुग्णालय, नाणावटी रुग्णालय, अपेक्स रुग्णालय, अपेक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालय.

* सुशील खोडवेकर (covid19nodal4@mcgm.gov.in) – कोहिनूर हॉस्पिटल, हिंदू सभा रुग्णालय, एसआरव्ही चेंबूर रुग्णालय, गॅलॅक्सी मल्टी स्पेशियालिटी रुग्णालय (वडाळा), एल. एच. हिरानंदानी रुग्णालय, सुराणा सेठिया रुग्णालय, फोर्टिस रुग्णालय (मुलुंड).

* राधाकृष्णन (covid19nodal5@mcgm.gov.in) – एस. एल. रहेजा रुग्णालय, लीलावती रुग्णालय, होली फॅमिली रुग्णालय, सेव्हन हिल्स हॉस्पिटल (रिलायन्स), बी.एस.ई.एस. रुग्णालय, शुश्रूषा रुग्णालय.