25 February 2020

News Flash

मुंबईतील पहिले जुळे चित्रपटगृह जमीनदोस्त होणार?

पालिकेने केलेल्या संरचनात्मक सर्वेक्षणात ही वास्तू अतिधोकादायक आढळून आली आहे.

‘गंगा-जमुना’ची इमारत अतिधोकादायक घोषित

इंद्रायणी नार्वेकर, मुंबई

मुंबईतील पहिले वहिले जुळे थिएटर म्हणून ख्याती असलेले ताडदेव येथील ‘गंगा-जमुना ‘ चित्रपटगृह लवकरच जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे. गेल्या किमान पंधरा वर्षांपासून हे चित्रपटगृह बंद अवस्थेत असले तरी या ताडदेव सर्कल या परिसराची ओळख गंगा-जमुना अशीच आजही आहे. या चित्रपटगृहांची इमारत पालिकेने यंदा पावसाळ्याच्या तोंडावर अतिधोकादायक ठरवली आहे. ही इमारत तत्काळ पाडून टाकण्यासाठी पालिकेच्या विभाग कार्यालयामार्फत नोटीसही धाडण्यात आली आहे.

गेल्या पंधरा वर्षांपासून हे चित्रपटगृह बंद पडलेले आहे. मुंबईत अनेक ठिकाणी जुळी, तिळी चित्रपटगृहे असले तरी त्यांची सुरुवात गंगा जमुनामुळे झाली होती.  त्याकाळात वातानुकू लित असलेल्या या चित्रपटगृहाची सुरुवात ‘हरे रामा हरे कृष्णा’ या सुप्रसिद्ध चित्रपटापासून  झाली. त्यानंतर सुहाग, मिस्टर नटवरलाल, कालीचरण  हे चित्रपट येथे खूप गाजले. अनेक चित्रपटांनी येथे रौप्य महोत्सवी आठवडे अनुभवले. तर, काही चित्रपट ५० आठवडय़ांहून अधिक काळ येथे गाजले.  ‘जान हाजीर है’ हा चित्रपट तब्बल ७५ आठवडे जमुनामध्ये चालला होता. ७० च्या दशकात मुंबईत मोठय़ा चित्रपटगृहांच्या यादीत गंगा जमुनाचा समावेश होता.  सन २००८ मध्ये या चित्रपटगृहाची पुनर्बाधणी करण्यात येणार होती. त्याकरीता जो आराखडा तयार करण्यात आला होता त्याला पालिकेने मंजूरीही दिली होती. मात्र त्याचे पुढे काहीच न झाल्यामुळे ही वास्तू गेली पंधरावर्षे नुसतीच उभी आहे.

‘पालिकेने केलेल्या संरचनात्मक सर्वेक्षणात ही वास्तू अतिधोकादायक आढळून आली आहे. मात्र या चित्रपटागृहात भाडय़ाने असलेल्या उपाहारगृहचालकाने या संरचना परिक्षण अहवालाला आव्हान दिले आहे. त्याने खासगीपणे करून घेतलेला संरचना अहवाल आणि पालिकेच्या अहवालात तफावत आढळल्यामुळे हे प्रकरण ‘टॅक’ (टेक्निकल अ‍ॅडव्हायजरी कमिटी) अर्थात तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठवण्यात आले आहे. मात्र पालिकेच्या अहवालानुसार ही धोकादायक झाली असून तत्काळ पाडून टाकण्याबाबत नोटीस मालकाला धाडण्यात आली आहे, अशी माहिती ‘डी’ वॉर्डचे साहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी दिली.

पुनर्बाधणी का रखडली?

यासंदर्भात चित्रपटगृहाचे मालक गुल आचरा यांच्याशी संपर्क साधला असता, पुनर्बाधणी प्रकरणात आपली फसवणूक झाल्याची तक्रार त्यांनी केली. ‘हे चित्रपटगृह ९९ वर्षांच्या मक्ता कराराने दिले होते. हा करार संपल्यानंतर २००६मध्ये एका व्यावसायिकाने चित्रपटगृहातील ५० टक्के मालकी हक्क घेतले.

त्याविरोधात आम्ही न्यायालयात गेलो. तेव्हा या जागेची तीन वर्षांत पुनर्बाधणी करण्याचे आश्वासन आम्हाला देण्यात आले. परंतु, गेली १५ वर्षे ही वास्तू तशीच पडून आहे,’ असे गुल आचरा म्हणाले. ‘मी केलेल्या संरचनात्मक तपासणीतही ही वास्तू धोकादायक ठरली आहे. पण भाडेकरूच्या अहवालात तफावत आहे. त्यामुळे तो सुद्धा प्रलंबित आहे. या वास्तूच्या सुरक्षेसाठी,वीजेचे बिल भरावे लागते, कर भरावा लागतो, त्यामुळे या वास्तूमुळे मला काही उत्पन्न तर नाहीच पण माझे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे पालिकेने ही वास्तू पाडून टाकावी,’असेही ते म्हणाले.

First Published on May 21, 2019 4:15 am

Web Title: bmc declared ganga jamuna theater building danger
Next Stories
1 गतिमंद मुलीची निर्घृण हत्या करणाऱ्या महिलेला जन्मठेप
2 हार्बरवर पावसाळ्यानंतर चार नवीन गाडय़ा
3 मध्य रेल्वेवरील सहा स्थानके गुन्हेगारांच्या रडारवर
Just Now!
X