पाच ठिकाणी पादचारी पूल, भुयारी मार्ग उभारणीला विलंब

मुंबईतील वाढत्या वाहनवर्दळीमुळे पादचाऱ्यांना रस्त्यांतून वाट काढणे कठीण बनले असतानाही, शहरात पाच ठिकाणी पादचारी पूल आणि पाच ठिकाणी भुयारी मार्ग उभारणीच्या कामासाठी पालिकेला मुहूर्त मिळालेला नाही. गिरगाव चौपाटी, तारापोरवाला मत्स्यालय, शीव जंक्शन, हिंदमाता अशा वर्दळीच्या ठिकाणी या पादचारी सुविधा उभारणे अपेक्षित होते. मात्र, चार वर्षांपूर्वी शिफारस करण्यात आलेल्या या प्रकल्पांचा अद्याप तांत्रिक अभ्यासही झालेला नाही. त्यामुळे या सुविधांसाठी मुंबईकरांना किती काळ प्रतीक्षा करावी लागणार, हे अनिश्चित आहे.

मुंबईमधील वाढती वाहतूक समस्या सोडविण्यासाठी सर्वसमावेशक चलनशीलता आराखडा तयार करण्याचा निर्णय घेत पालिका प्रशासनाने या कामासाठी सल्लागार म्हणून मे. ली. असोसिएट्स, साऊथ एशिया या कंपनीची नेमणूक केली होती. या कंपनीने मुंबईतील वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास करून पालिकेला सर्वसमावेशक चलनशीलता आराखडा सादर केला. सल्लागार कंपनीने मुंबईतील अनेक भागांची तांत्रिक तपासणी करून काही ठिकाणी पादचारी पूल, भुयारी मार्ग आणि उड्डाणपूल उभारण्याची शिफारस या आराखडय़ात केली आहे.

गिरगाव चौपाटी येथील महत्त्वाच्या व्यक्तींचा राबता असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस मार्गावर सुसाट वेगात वाहनांची दौड सुरू असते. रस्ता ओलांडताना सिग्नल यंत्रणेचे नियम धाब्यावर बसविणाऱ्यांना अधूनमधून अपघाताचा सामना करावा लागतो. त्यामुळे गिरगाव चौपाटीवरील सुखसागर हॉटेलजवळ पादचारी पूल बांधण्याचा, तसेच तारापोरवाला मत्स्यालयाजवळ भुयारीमार्ग उभारण्याची शिफारस या आराखडय़ात करण्यात आली आहे. त्याच बरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील सायन जंक्शनजवळ; दादर पूर्व येथे हिंदमाता आणि जगन्नाथ शंकरशेट उड्डाणपुलामध्ये शंकर आबाजी पालव मार्ग व शांती कॉफी हाऊसजवळ; लालबाग व परेल टीटी उड्डाणपुलामध्ये परळ सेंट्रल रेल्वे लोको शेडजवळ; लालबाग व परळ टीटी उड्डाणपुलामध्ये ताकिया मस्जिद समोर अशा चार ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याची शिफारस या आराखडय़ात करण्यात आली आहे. तसेच या आराखडय़ातील शिफारसीनुसार मानखुर्द जवळील व्ही. एन. पुरव मार्गावर तीन ठिकाणी; तसेच विक्रोळी येथील आदिशंकराचार्य मार्गावर भुयारी मार्ग उभारण्याचे सुचवण्यात आले.

कंपनीने २०१४ मध्ये सादर केलेल्या या आराखडय़ावर धूळ साचली होती. ती आता दूर सारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र पादचारी पूल आणि भुयारी मार्गासाठी सुचविण्यात आलेल्या जागेचा तांत्रिकदृष्टय़ा अभ्यास करण्यात येणार असून त्यानंतर ते बांधण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे हे प्रकल्प होणार की नाही, इथपासून संभ्रमाचे वातावरण आहे.

सल्लागाराने पादचारी पूल आणि भुयारी मार्ग उभारण्याबाबत सूचित केलेल्या ठिकाणांचा तांत्रिक अभ्यास करण्यात येत आहे. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर या कामांबाबत आवश्यक ती प्रक्रिया सुरू करण्यात येईल.                                                                                                      

-देवीप्रसाद कोरी, प्रमुख अभियंता (पूल), मुंबई महापालिका