महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट करणं आयएएस अधिकारी निधी चौधरी यांना भोवलं आहे. त्या वादग्रस्त ट्विटची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त पदावरून त्यांची मंत्रालयात उचलबांगडी करण्यात आली आहे. निधी चौधरी यांची मुंबई महापालिकेतून मंत्रालयात पाणी पुरवठा विभागात बदली करण्यात आली आहे. तसेच त्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीसही त्यांना देण्यात आली आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली आहे.

कोण आहेत निधी चौधरी –
निधी चौधरी या आयएएस 2012 बॅचच्या अधिकारी असून मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त (विशेष) म्हणून कार्यरत आहेत. याआधी त्या सहाय्यक कलेक्टर होत्या.

काय आहे प्रकरण
17 मे रोजी निधी चौधरी यांनी ‘महात्मा गांधी यांची 150 वी जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. पण, आता वेळ आली आहे…जे रस्ते, संस्थांना गांधींचे नाव दिले आहे, ते काढून टाकावे…जगभरातील त्यांचे पुतळे पाडण्यात यावेत…तसेच नोटांवरूनही त्यांचा फोटो काढून टाकावा…हीच आपल्या सर्वांकडून त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल…30-1-1948 साठी थँक्यू गोडसे.’ असे वादग्रस्त ट्विट करुन महात्मा गांधींच्या पार्थिवाचं छायाचित्र त्यासोबत शेअर केलं होतं. त्यानंतर त्यांचं हे ट्विट काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झालं. त्यावर लोकांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत असल्याचं पाहून निधी चौधरी यांनी ते ट्विट डिलीट केले आणि नवीन ट्विट्सद्वारे आपली बाजू मांडली आहे.

निधी चौधरी यांचं स्पष्टीकरण 
काही लोकांचा गैरसमज झाल्यामुळे मी गांधीजींबाबतचं ट्वीट डिलीट केलं आहे. तुम्ही 2011 पासून माझी टाईमलाईन पाहिलीत, तर त्यांना समजेल, की मी गांधीजींचा अवमान करण्याचा स्वप्नातही विचार करु शकत नाही. माझे ट्वीट व्यंगात्मक होते. आंदोलन करणाऱ्यांनी ते पूर्ण वाचलेले नाही. त्याचा चुकीचा अर्थ लावला जातो आहे. गांधीजींवर माझी अपार श्रद्धा आहे. माझ्याकडून त्यांचा अवमान होणे शक्यच नाही. गांधीजींवर यापूर्वी मी अनेकदा ट्वीट केले आहे, ती पाहू शकता. गांधीजी या देशात जन्माला आले, याबाबत आपण देवाचे आभार मानले पाहिजेत, असे ट्वीट मी यापूर्वी केलेले आहेत. त्यामुळे गांधीजींची हत्या करणाऱ्याचे समर्थन मी कधीच करणार नाही. काही लोक या ट्वीटचा राजकीय लाभ उठवू पाहात आहेत, हे दुर्दैवी आहे. गांधीजींचा अवमान करण्याचा मी स्वप्नातही विचार करु शकत नाही. असं स्पष्टीकरण निधी यांनी आपल्या विविध ट्विटमध्ये दिलं आहे.