News Flash

“मुंबई महापालिका म्हणजे यशवंत जाधव प्रा. लि. कंपनी आहे काय?”

विकास निधी वाटपावरून भाजपा नेते आशिष शेलार भडकले

आशिष शेलारांचा पुन्हा शिवसेनेवर निशाणा

विकास निधी वाटपावरून मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपा पुन्हा आमने-सामने येण्याची चिन्हं आहेत. २०२१-२२ या वर्षाच्या अर्थसंकल्पाला मंजूरी देताना महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीला तब्बल ६५० कोटी रुपये दिले असून, भाजपाची केवळ ६० कोटी रुपये निधी देऊन बोळवण करण्यात आली आहे. कमी विकास निधी देण्यात आल्यानं भाजपाला संताप अनावर झाला असून, “मुंबई महापालिका म्हणजे यशवंत जाधव प्रा. लि. कंपनी आहे काय?,” असा सवाल करत भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीकास्त्र डागलं आहे.

सातत्यानं शिवसेनेवर टीका करणाऱ्या भाजपाच्या पदरात ६५० कोटींपैकी फक्त ६० कोटी रुपये इतकाच विकास निधी टाकण्यात आला आहे. तर राज्यात अडचणीच्या वेळी साथ देणाऱ्या काँग्रेसच्या पारड्यात सत्ताधाऱ्यांनी ९० कोटी रुपयांचे दान टाकले आहे. यामुळे भाजपा नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनीही विकास निधी वाटपावरून सवाल उपस्थित करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “६५० कोटी विकास निधीपैकी शिवसेनेच्या ९७ नगरसेवकांना २३० कोटी, भाजपाच्या ८३ नगरसेवकांना ६० कोटी, काँग्रेसच्या २९ नगरसेवकांना ८१ कोटी आणि हो स्थायी समिती अध्यक्षांना एकट्याला ३० कोटी… मुंबई महापालिका म्हणजे यशवंत जाधव प्रा. लि. कंपनी आहे काय? हा दुजाभाव मुंबईकरांसोबत करताय लक्षात असू द्या!,” अशा शब्दात शेलार यांनी शिवसेनेला सुनावलं आहे.

प्रशासनाने दिलेल्या ६५० कोटी रुपयांपैकी प्रत्येक नगरसेवकाला एक कोटी रुपये याप्रमाणे २२७ नगरसेवकांना २२७ कोटी रुपये नगरसेवक निधी देण्यात येणार आहेत. उर्वरित रक्कमेपैकी ८३ नगरसेवक असलेल्या भाजपला ६० कोटी रुपये, तर २९ नगरसेवक असलेल्या काँग्रेसला ९० कोटी रुपये, आठ नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला २१ कोटी रुपये, तर सहा नगरसेवक असलेल्या समाजवादी पार्टीला १८ कोटी रुपये विकास निधी देण्यात येणार आहे. उर्वरित २३३ कोटी रुपये सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये कामाच्या स्वरुपानुसार वाटण्यात येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2021 9:32 am

Web Title: bmc development fund ashish shelar slams shivsena bmh 90
Next Stories
1 गोष्ट मुंबईची : महाराष्ट्र पोलिसांच्या मुख्यालयात होतं विधानभवन!
2 मुंबई सेन्ट्रल आगारात मिनी मंत्रालय?
3 नवी मुंबई, वसई-विरार, कोल्हापूर महापालिकांची निवडणूक लांबणीवर?
Just Now!
X